नंदनवन कॉलनीतील नागरिकांसह नगरसेवक उपोषण करणार – निखिल वारे
अहमदनगर प्रतिनिधी – विजय मते
अमृत योजनेंतर्गत शहरातील विविध भागात ‘ऑक्सिजन पार्क’ उभारण्यात आले. यामध्ये प्रभाग दोन मधील पाईपलाईन रोडवरील नंदनवन कॉलनीतही पार्क उभारण्यात आला.
परंतु या ‘आक्सिजन पार्क’मधून ऑक्सिजन गायब होऊन दुर्गंधी, घाण, कचराच पहावयास मिळत आहे. संबंधित ठेकेदाराकडे या पार्कची देखभालीची जबाबदारी असतांना ते दुर्लक्ष करत आहे. याबाबत दोन महिन्यांपासून मनपाकडे पाठपुरावा करत असून, उडवा-उडवीची उत्तरे मिळत आहे. त्यामुळे या ठेकेदाराचा ठेका रद्द करुन नवीन निविदा काढून या पार्कची तातडीने स्वच्छता करुन नागरिकांसाठी खुले करावे, अन्यथा नागरिकांसह नगरसेवकांना उपोषणाशिवाय पर्याय नाही, असा इशारा माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दिला.
या उद्यानाची पाहणी नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार यांनी करुन ८ दिवसात मनपाने दखल घेतली नाही तर आयुक्तांकडे निवेदन देऊन उपोषणाचा मार्ग अवलंबू, असे सांगितले.
प्रभाग २ मधील पाईपलाईन रोडवरील नंदनवन कॉलनीतील रस्ता, ड्रेनेज, वीज, लाईटचा प्रश्न सोडविले. या कॉलनीतील ओपन स्पेसमध्ये अमृत योजनेंतर्गत ‘ऑक्सिजन पार्क’ साकारले. २०१० साली नावाप्रमाणे फुललेले हे नंदनवन आज मात्र ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे, मनपाच्या नियोजनशुन्य कारभाराने भकास झाले आहे. त्यामुळे ‘उद्यान असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. उद्यानातील कामे बांधकाम विभागाकडून होत असल्याने त्यांचे दुष्पपरिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे, असे श्री.वारे यांनी यावेळी स्पष्ट केले.
उपनगरातील सर्वात सुंदर असा हा जॉगिंग पार्क, गार्डनमध्ये आज अस्वच्छता, वाढलेले गवत, झाडे-झुडपांमुळे भकास दिसत आहे. मोठ-मोठे सर्प दिवसा येथे निघतात, तरी मनपाने तातडीने या उद्यानाची साफ-सफाई, स्वच्छता करुन पूर्वी प्रमाणे हे उद्यान विकसित करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
यावेळी शामराव बुधवंत, अण्णा पाटील, दिपक लगड, अविनाश भोसले, रामदास ससे, अशोक खेले, रेमजित धुप्पड, निखिल पवार, राजेंद्र सोनवणे, विनायक निंबाळकर, भास्कर जाधव, धीरज गायकवाड, अशोक कदम, अशोक ढुमणे, अलका कदम, शोभा पाटील, सीमा ससे, सुजाता सोनवणे, हेमलता निंबाळकर, रजनी पवार, अंतरप्रित धुप्पड आदिंसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.