कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
नगर सोलापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी आत्तापर्यंत कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना २२० कोटी रुपये वाटप करण्यात आले असून,९२% जमिनींचे अधिग्रहणाची काम पूर्ण झाले आहे.अशी माहिती प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
महसूल विभागाच्या वतीने कर्जत व जामखेड तालुक्यातील विविध कामांचे माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह येथे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी अजित थोरबोले,कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे,जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे,सार्वजनिक बांधकाम विभागाची अधिकारी अमित निंबकर,नामदेव राऊत,नितीन धांडे,सुनील शेलार,विशाल मेहेत्रे,दिपक यादव यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी थोरबोले यांनी सांगितले की नगर सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे अधिग्रहणाचे कर्जत तालुक्यातील काम सर्वात जास्त म्हणजे ९२ टक्के झाले आहे व सुमारे ६२ टक्के शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यामध्ये एकूण ३५४ कोटी रुपयांचे आवार्ड झाले असून त्यापैकी २२० कोटी रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.उर्वरित ३८ टक्के शेतकऱ्यांचे आपसातील वाद किंवा इतर अडचणीमुळे पैसे देण्याचे राहिले असून आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पाच गावांमध्ये समुपदेशन कॅम्प लावून त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
श्रीगोंदा व नगर तालुका यांच्या तुलनेत कर्जत तालुक्यामध्ये जमिनीचे अधिग्रहण व शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला तुलनेने खूप अधिक देण्यात आलेला आहे असे थोरबोले यांनी सांगितले.
पुढील तीन महिन्यांमध्ये महसूल विभागाद्वारे महाराजस्व अभियानांतर्गत दाखल्यांचे वाटप,रेशन कार्ड वितरण करणे,ऑनलाइन करणे,विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी निवड करणे,त्यांची संख्या वाढविणे शिव रस्ते,पाणंद रस्ते,मोकळे करून त्यांची भूमी अभिलेख मध्ये नोंद करणे,दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी मंडळाच्या ठिकाणी फेरफार अदालत घेणे,मोफत सातबारा वाटप करणे,प्रत्येक गावात तलाठी यांच्या उपस्थितीबाबत वेळापत्रक तयार करून त्याप्रमाणे उपस्थिती ठेवणे, तलाठी दप्तर तपासणी करणे, पीक पाहणी,पोटखराबा, तालुक्यातील प्रत्येक विभाग प्रमुख अधिकारी यांनी प्राधान्य क्रमांक चे एक विशेष काम हाती घेणे अशा योजना आगामी काळामध्ये राबविण्यात येणार आहे असे थोरबोले म्हणाले.
पुढे बोलताना थोरबोले म्हणाले विजय सप्तपदी अभियानांतर्गत महसूल विभाग आधारे पोटखराबा लागवडीखाली आणण्याबाबत मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.त्याद्वारे सात-बारा उताऱ्यावर प्रवर्ग म्हणून नमूद असलेल्या पोटखराब क्षेत्र व लागवडी लायक क्षेत्रात आणण्यात येत आहे.कर्जत व जामखेड तालुक्यामध्ये नवीन ४७ तलाठी कार्यालय बांधण्यात येणार आहेत.
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की,जनता दरबार घेण्यापूर्वी सर्व शासकीय विभागांचे नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर आपला भर आहे.याशिवाय महसूल प्रशासन जास्तीत जास्त सकारात्मक करण्याबाबत पुढील काळामध्ये काम केले जाईल असे सांगितले.
उपस्थितांची तहसीलदार नानासाहेब बागडे यांनी आभार मानले.