कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत नगरपंचायतच्या १७ जागांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले,तर काल दिवसभरात एकूण २९ विविध पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने काल जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले,सकाळी अक्काबाई मंदिरापासून भव्य रॅली काढण्यात आली.यानंतर बाजारतळ येथे जाहीर सभा झाली.यावेळी माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना आमने-सामने येऊन दोन वर्षांच्या केलेल्या विकास कामाबद्दल जाहीर चर्चा करण्याचे खुले आव्हान दिले.
यावेळी खासदार सुजय विखे पाटील,सुवेंद्र गांधी,जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,निरीक्षक बाळासाहेब महाडिक,अंबादास पिसाळ, शांतीलाल कोपनर, अल्लाउद्दीन काझी,अशोक खेडकर,काकासाहेब धांडे, वैभव शहा,विनोद दळवी, अनिल गदादे,सुनील यादव, अंकुशराव यादव,काका डेरे यासह अनेक पदाधिकारी प्रमुख नेते १७ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरलेले सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना खुले आव्हान देताना पुढे म्हणाले की,दोन वर्षांमध्ये आपण अनेक वेळा आमदार रोहित पवार यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारले आहे.मात्र एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही.यामुळे आता आपण या जाहीर सभेच्या माध्यमातून त्यांना आमने-सामने येऊन चर्चा करण्याचे आव्हान देत आहोत.
कर्जत शहरात दोन राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे.मात्र त्यांना देखील विचारा त्यांची काय अवस्था झाली आहे.जागा वाटपासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आले तर त्यांना भेट देखील दिली नाही.अशी दुरावस्था राज्यातील महा विकास आघाडीची याठिकाणी झाली आहे आणि लोकप्रतिनिधीचा विकास फक्त गप्पा मारण्याचे काम करून जनतेला फसवीत आहे.
लोकांना दिलेला शब्द त्यांनी प्रामाणिकपणे पाळावा. सर्वसामान्य जनतेला दबावाखाली आणू नका,हा राम शिंदे या जनतेसाठी जीवाची बाजी लावून पुढे उभा राहील.आता जनता दडपशाही,मुस्कटदाबी सहन करणार नाही असे राम शिंदे म्हणाले.
यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की,ज्या राम शिंदे यांनी मोठे मन करून भाजपमध्ये ज्यांना विविध पदे दिली.आज त्यानीच राम शिंदेचा विश्वासघात केला.
त्यामुळे आजची निवडणूक ही भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडी अशी नसून ती विश्वासघातकी माणसाची लायकी दाखविणारी आहे.राम शिंदे यांच्या पाठीमागे जनता उभी राहणार आहे.कारण त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी काम केले आहे.
आमचे उमेदवार स्वच्छ आणि प्रामाणिक आहे.ते सर्वसामान्य नागरिकांच्या हवाली केले आहे.त्यामुळे जनतेनी त्यांना साथ द्यावी असे आवाहन खा. विखे यांनी उपस्थित जनतेला केले.
यावेळी अरुण मुढे,सुवेंद्र गांधी,बाळासाहेब महाडीक,आरपीआयचे शशिकांत पाटील,दादासाहेब सोनमाळी,अल्लाउद्दीन काझी,वैभव शहा,अंबादास पिसाळ,अशोक खेडकर यांची भाषणे झाली प्रास्ताविक सचिन पोटरे यांनी केले आभार अनिल गदादे यांनी मानले.