शेवगाव प्रतिनिधी :-
शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मौजे कांबी येथील नांदणी-चांदणी नदीला पूर येऊन यापुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून काही जणांचे संसार उघड्यावर आले आहेत. काही घरांची पडझड झाली असून बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे देखील मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील शेतातील पिकांना देखील या पुराच्या पाण्याने चांगलाच फटका बसला असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांना मुकावा लागणार आहे. पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेली जनावरे ऐन पोळा सणाच्या खांदा मळणीच्या दिवशीच या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी बोलताना काकडे म्हणाले की, कांबी येथील दुकानदार व शेतकरी यांचे अतोनात असे न भरुन येणारे नुकसान झाले असून या नुकसानीची भरपाई व पंचनामा करावा या मागणीसाठी शासन दरबारी आवाज उठवला जाईल. पाणी गावात घुसुन पुन्हा अशा प्रकारे नुकसान होऊ नये यासाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून नदी खोलीकरण व नदी कडेला दगडी भिंत उभारणीसाठी शासन दरबारी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असेही ते बोलताना म्हणाले. यावेळी जनशक्तीच्या वतीने नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना किराणा कीटचे वाटप करण्यात आले.