अरणगावच्या कोतवालचा मागील सात महिन्यापासून पगार थकित
कोतवालास थकित पगार देऊन चुकीचा अहवाल देणार्यावर कारवाई करण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
अरणगाव (ता. नगर) येथील कोतवालचा मागील सात महिन्यापासून थकवलेला पगार द्यावा व कोतवालास वेठीस धरुन चुकीचा अहवाल देणार्या कामगार तलाठी यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. पगार बंद झाल्याने कोतवालाच्या कुटुंबीयांपुढे उपासमारीची वेळ आली असताना, सदर कोतवालास पगार न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अरणगाव (ता. नगर) येथे अनिल चंद्रकांत कांबळे कोतवाल म्हणून कार्यरत आहे. कामावर असताना तहसीलदार यांनी १ एप्रिल रोजीच्या पत्रान्वये एक वर्षे गैरहजर असल्या बाबतचा पत्र देऊन त्यांच्यावर अन्याय केला आहे. परंतु ६ मे रोजी ते कामावर हजर झाले होते. तरी देखील कामगार तलाठी यांनी चुकीचा अहवाल सादर केला.
यामुळे त्यांच्यावर कार्यवाही होऊन त्यांचे मार्च २०२१ पासून आज अखेर पर्यंत पगार रोखण्यात आले आहे. यामुळे कांबळे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ प्रशासनाने आनली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
कामगार तलाठीने चुकीच्या पध्दतीने अहवाल सादर केल्यामुळे कांबळे यांचे कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, या प्रकरणात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी थकवलेला पगार द्यावा व कोतवालास वेठीस धरुन चुकीचा अहवाल देणार्या कामगार तलाठी यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.