जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था व मराठा सेवा संघ यांच्यावतीने सत्कार
कु.दिव्यांगी लांडे हीच्या यशाने इतर मुलींनाही प्रेरणा मिळणार – इंजि. सुरेश इथापे
नगर – आज क्रीडा क्षेत्रालाही ग्लोबोलायझेशन प्राप्त झाले आहे, त्यामुळे या क्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. जिद्द. चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यात यश मिळविता येऊ शकते. क्रीडा क्षेत्रात मुलींनी सहभागी होऊन, राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणे ही नगरकरांसाठी अभिमानास्पद अशीच गोष्ट आहे. कु.दिव्यांगी लांडे हीने आपल्या कर्तुत्वाने एक-एक करत राष्ट्रीय स्पर्धा गाजवली आहे. तिच्या यशाचे कौतुक करणे आणि तिला प्रोत्साहन देणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. नगरसारख्या शहरातून राष्ट्रीय स्तरावर यश मिळविणे हे सोपे नव्हते. तिच्या या यशाने इतर मुलींनाही प्रेरणा मिळणार आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुरेश इथापे यांनी केले.
पटणा (बिहार) येथे झालेल्या 67 व्या राष्ट्रीय अॅथेलॅटिक्स स्पर्धेत नगरची खेळाडू दिव्यांगी कृष्णा लांडे हीने सिल्व्हर मेडल प्राप्त केल्याबद्दल तिचा जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था व मराठा सेवा संघ यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन किशोर मरकड, संचालक सतीश इंगळे, प्रा.किसनराव पायमोडे, उदय अनभुले, अच्चुत गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड, बबन सुपेकर, रणजित रक्ताटे, प्रशांत बोरुडे, तेजस कासार, कृष्णा लांडे, अतिश रोहोकले आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सतीश इंगळे म्हणाले, नगरमधील अनेक खेळाडू आपल्या कर्तुत्वाने क्रिडा क्षेत्रात चमकत आहेत. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील त्यांचे यश हे नगरमधील खेळाडूंना प्रोत्साहन ठरणारे आहे. कु.दिव्यांगी लांडे हीने राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या यशाने नगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे सांगितले.
कु.दिव्यांगी लांडे हीने या राष्ट्रीय स्पर्धेत 17 वर्षांखालील महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाचे नेतृत्व केले. या अगोदरही विविध राज्य मध्ये झालेल्या स्पर्धेत गोल्ड मेडल, सिल्व्हर मेडल प्राप्त केले. नगरच्या पेमराज सारडा विद्यालयाची ही विद्यार्थी आहे. तिच्या राष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
- Advertisement -