तुमची कुंडली काढायला लावू नका !
केडगांवमध्ये नीलेश लंके यांचा इशारा
केडगांवकरांच्या मी पाठीशी, लंके यांची ग्वाही
केडगांव : प्रतिनिधी
आतापर्यंत तुम्हाला पचले असेल. मला तुमची कुंंडली काढायला लावू नका. तुम्हाला दहशतीसाठी चार गुंड पाळता येत असतील. वेळ आली तर ते पाय लावून पळून जातील. दुसरीकडे माझ्याकडे असंख्य जिवाभावाचे सहकारी आहेत. पाळणारे गुुंड किती पुढे येतात हे मलाही माहिती आहे. माझे सहकारी पळाले ना मी माझ्या बापाचे नाव बदलून ठेवील. असे सांगत आ. नीलेश लंके यांनी केडगांवातील गुंडगिरी हद्दपार करण्याची ग्वाही दिली.
लोकसभा निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ केडगांव उपनगरात प्रचार फेरी तसेच कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले हाते. त्याप्रसंगी लंके हे बोलत होते.
लंके म्हणाले, आपण ग्रामपंचायत, महानगरपालीका, विधानसभेच्या निवडणूकीत गांभर्याने मतदान करतो. लोकसभेची निवडणूक देशाच्या हितासाठी महत्वाची असते. देशाचे भवितव्य घडविणारी ही निवडणूक असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान वाचविण्याची ही निवडणूक आहे. आज देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. न्यायदेवता म्हणून आपण ज्या संस्थेकडे पाहतो, त्या न्यायसंस्थेला हुकूमशाहीच्या चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. वरीष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर त्याच पध्दतीने न्यायव्यवस्थेकडून निकाल दिला जातो. केंद्रीय एजन्सीचा वापर करून विविध राज्यात सत्तांतर करण्याचा प्रयत्न केला जातो. ईडी, सीबीआयचा वापर करून राजकारण्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अतिशय चांगले काम करणारे मुख्यमंत्री त्यांनाही तुरूंगात डांबले जात असल्याचा आरोप लंके यांनी केला.
▪️चौकट
केंद्रात, राज्यात दडपशाही
महाराष्ट्रातही अनेक मंत्री, आमदारांना त्रास दिला गेला. अनिल देशमुख, नवाब मलीक यांना तुरूंगात डांबण्यात आले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर दोषारोपपत्र सिध्द होत नाही असा न्यायालयाने निर्वाळा दिला. सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून झाला की तो पुढारी साधूसंत होतो. केंद्रात दडपशाही सुरू असून राज्यात त्यापेक्षाही दुप्पट पध्दतीने दडपशाही सुरू असल्याचा आरोप लंके यांनी केला.
▪️चौकट
जिल्हयात सत्तेचा गैरवापर
नगर जिल्हयात विविध यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, जिल्हा परिषद यांचा गैरवापर करण्यात येत आहे. नगरच्या यश ग्रँड हॉटेलमध्ये मीडियाचे लोक राहत होते. त्यांच्याकडे काहीतरी पन्नास साठ हजार रूपयांची रक्कम सापडली. दबावाखाली सायंकाळी सहा वाजल्यापासून आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन बसविण्यात आले. सत्तेचा चुकीच्या पध्दतीने वापर करण्यात येत असल्याचे लंके यांनी सांगितले.
▪️चौकट
डफडेवाले !
निवडणूकीला सामोरे जाताना पाच वर्षात तुम्ही ज्या घोषणा दिल्या त्या अजेंडयावर मते मागणे आपेक्षित आहे. पाच वर्षाच्या काळात काय काम केले हे जनतेपुढे मांडले पाहिजे. मात्र विकासाचा काही मुद्दा राहिलाच नाही. त्यामुळे मतदारसंघात साखर, डाळीचे वाटप करण्यात आले. प्रत्येक भागात चार डफडेवाले ठेवण्यात आले असल्याचा आरोप लंके यांनी केला.
▪️चौकट
काचेच्या घरात राहता, गाठ माझ्याशी !
आम्ही निवडणूक खेळ म्हणून खेळतो. आमच्या कार्यकर्त्यांना डिवचायला प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे. काचेच्या घरात राहून आमच्यावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नका. मागचं पुढचं आम्हाल काढता येईल, आम्ही ते काढतो. ग्रामपंचायत सदस्यापासून आमदारकीपर्यंत व आता खासदारकीपर्यत नीलेश लंके आलेला नाही. तुम्ही रस्त्यावर राहता, मला गमवायचे काही नाही हे लक्षात ठेवा. आमचा नाद करायचा नाही. दहशत निर्माण करू नका. मागचे खासदार बोलले असतील, मी दिलेला शब्द कृतीत आणणारा कार्यकर्ता आहे. माझ्यावर वार केला तर मी सहन करेल परंतू माझ्या कार्यकर्त्यावर वार केला तर नीलेश लंके सहन करणार नाही असा इशारा लंके यांनी दिला.
▪️चौकट
प्रशासनाने निवडणूक वेगळया दिशेने नेऊ नये
तुम्ही लोकांना प्रेमाणे जिंका, आमची हरकत नाही. परंतू मतदानासाठी तुम्ही दमदाटी, दादागिरी केली तर सहन केली जाणार नाही. कोण आमच्यासोबत फिरला, कोणी आमचा प्रचार केला तर त्रास दिला गेला जातोय. पोलीस प्रशासनास माझी विनंती असेल ही निवडणूक वेगळया दिशेला नेण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. तुमचा कोणी उदे उदो करीत असेल आम्ही तुमच्याकडे पाहणारही नाही. मात्र आमचे कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले ?, कोणी आमचे स्टेटस ठेवले त्याला दमदाटी केली तर मी तुमच्या दारात येउन बसेल.
नीलेश लंके
उमेदवार
▪️चौकट
तुमचे आशिर्वाद घेण्यासाठी मी आलोय
केडगांवकरांचे आशिर्वाद घेण्यासाठी मी इथे आलोय, मला संधी द्या, मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुम्हाला अभिमान वाटेल असे काम करून दाखवेल अशी ग्वाही आ. लंके यांनी यावेळी दिली.