खा. लंके रिक्षातून शरद पवारांच्या भेटीला !
नीलेश लंके यांच्या साधेपणाचे दिल्लीतही आप्रुप
नगर : प्रतिनिधी
बुधवारी सकाळी महाराष्ट्र सदनमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी नगरचे खासदार नीलेश लंके हे चक्क अॅटो रिक्षामधून प्रवास करीत पोहचले.
महाराष्ट्र सदनमध्ये खा. लंके यांच्यासाठी एक खोली देण्यात आली असून तिथे शपथविधीसाठी दिल्लीत आलेल्या महिलांची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे लंके हे हॉटेलमध्ये वास्तव्यास असून बुधवारी सकाळी शरद पवार यांच्या भेटीचा निरोप मिळाल्यानंतर वाहन उपलब्ध नसल्याने लंके यांनी अॅटो रिक्षाने महाराष्ट्र भवनापर्यंत पोहचण्याचा पर्याय स्विकारला.
गळयात संसद सदस्याचे ओळखपत्र असलेल्या व्यक्तीने संसद भवनापर्यंत सोडण्याची सुचना केल्यानंतर अॅटोचालकही आचंबित झाला. त्याने खा. लंके यांना आदराने महाराष्ट्र भवनापर्यंत पोहचविण्याची तयारी दर्शविली. लंके हे महाराष्ट्र सदनापर्यंत अॅटो रिक्षाने पोहचल्याचे तिथे उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील नेते तसेच कार्यकर्त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनीही तोंडात बोट घातले.
दिल्ली येथे नीलेश लंके यांच्यासाठी सध्या वाहनाची व्यवस्था नाही. खा. सुप्रिया सुळे यांचे वाहत ते वापरतात. मात्र खा. शरद पवार यांच्या भेटीचा निरोप आला त्यावेळी लंके यांच्याजवळ एकही वाहन नव्हते. त्यांनी हॉटेलबाहेर येत थेट रिक्षाला हात करून महाराष्ट्र भवन लवकरात लवकर जवळ करण्याचा निर्णय घेतला.
लंके हे सन २०१९ मध्ये आमदार झाले. मात्र त्यानंतरही त्यांचा साधेपणा नेहमीच अनुभवण्यास मिळाला. अनेकदा त्यांनी दुचाकीवरून प्रवास केला. कधी मारूती ओमीनी तर कधी मारूती ८०० कारमध्येे प्रवास करतानाही त्यांना अनेकांनी पाहिले आहे.मुंबईत आमदार निवासमध्ये लंके हे नेहमीच जमीनीवर झोपणे पसंत केले. कोव्हीड सेंटरमध्येही हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत जमीनीवर झोपल्याची अनेक छायाचित्रे सोशल मिडियावर मोठया प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.