कांदा निर्यात : महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं ?- Advertisement -
गुजरातच्या कांदा निर्यात धोरणावर शरद पवारांचा निशाणा
नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगांव येथे सभा
शेवगांव : प्रतिनिधी
केंद्र सरकारनेे गुजरातमधील शेतकऱ्याने पिकविलेल्या कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली. गुजरातचे शेतकरी आमचे शत्रू नाहीत. त्यांचा कांदा निर्यात झाला तर आम्हाला आनंद आहे. मात्र गुजरातच्या कांद्याला परवानगी मिळत असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं ? असा प्रश्न उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत पवार हे बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, सुभाष लांडे, राजेंद्र फाळके, प्रभावती घोगरे, शिवशंकर राजळे, नितिन काकडे, बंडू रासणे आदी यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, कांदा जिरायत शेतकऱ्याचे महत्वाचे पिक. केेंंद्र सरकारने निर्णय घेतला कांदा देशाबाहेर पाठवायचा नाही, परराज्यात पाठवायचा नाही. शेतकऱ्याच्या हाती दोन पैसे मिळत असताना कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. साखर, उसाच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य अव्वल आहे. या उद्योगातून विविध उपपदार्थांची निर्मिती केली जाते. या उद्योगाचे धोरणही बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याने केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारेे नसल्याचा घणाघात पवार यांनी केला.
▪️चौकट
लंके यांच्यासारखे कोरोनातील काम केंद्राला का जमले नाही ?
नीलेश लंके हे पारनेरसारख्या दुष्काळी भागातील व्यक्तीमत्व. कोरोना संकटात त्यांनी ३३ हजार कोरोना रूग्णांना उपचार मिळवून दिले. घरी न जाता कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये झोपून त्यांना दिलासा दिला. लॉकडाउनमध्ये घरी जाणाऱ्या नागरीकांसाठी सुविधा दिली. जे काम नीलेश लंके करू शकतात ते काम केंद्र सरकार का करू शकले नाही असा सवाल पवार यांनी यावेळी केला.
▪️चौकट
पाणी, एमआयडीसीसाठी आम्ही पुढाकार घेऊ
या भागातील शेतीला पाणी हवे आहे. पाणी असेल तर सोने पिकविण्याची धमक बळीराजात आहे. ताजनापुरच्या पाणी योजनेची चर्चा अनेक वर्षांपासून होत आहे. रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीचीही आवश्यकता आहे.१३ मे नंतर निवडणूकीची प्रक्रिया संपल्यानंतर ताजनापुर योजना, औद्योगिक वसाहतीसाठी आम्ही प्रयत्न करू
शरद पवार
▪️चौकट
जनतेचा उमेदवार
जनतेचा उमेदवार कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे नीलेश लंके होय. या गडयाने या मतदार संघात काय जादू केली माहीती नाही. रात्री दोन वाजेपर्यंतही त्यांची लोक वाट पाहत असतात. पारनेरमध्ये गेल्यानंतर त्यांच्या कामाचे कौतुक ऐकण्यास मिळते. विरोधी उमेदवाराला सत्तेचा पैशांचा दर्प झाला असून त्यांचे गर्वहरण करण्यासाठी नीलेश लंके यांना विजयी करून देशात इतिहास घडवायचा आहे. हा लोकशाहीचा विजय ठरणार आहे. विरोधी उमेदवार मोठी पार्टी आहे. त्यांना मदत केली काय, नाही केली काय सर्वांना त्रास देणे त्यांचा पिंड असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
▪️चौकट
विखेंकडून सत्तेचा गैरवापर
विरोधी उमेदवार हे त्यांची सत्ता जनतेसाठी नव्हे तर प्रतिष्ठेसाठी वापरत आहेत. आम्ही एखाद्या हॉटेलवर बसलो तरी त्या हॉटेलवर दुसऱ्या दिवशी कारवाई केली जाते. आमच्यासोबत फिरले तर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. त्यांच्याकडून सत्तेचा प्रचंड गैरवापर सुरू असल्याची टीका नीलेश लंके यांनी केली.
▪️चौकट
निवडणुकीसाठी लंके यांना आर्थिक मदत
दादाभाऊ घनशाम जायभाय १ लाख, अशोक नामदेव खेडकर व दिपक मधुकर देहादराई यांनी नीलेश लंके यांच्या निवडणूक खर्चासाठी प्रत्येकी ११ हजार रुपयांची मदत या सभेत दिली.
▪️चौकट
शिंदे गटाचे आव्हाड राष्ट्रवादीत
शिंदे गटच्या शिवसेना सहकार सेनेचे तालुकाध्यक्ष मारुती आव्हाड यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
▪️चौकट
चोळके यांचा पाठिंबा
या सभेत देवळाली प्रवरा येथील अपक्ष उमेदवार डॉ.योगिता प्रवीण चोळके यांनी निवडणुकीतून माघार घेत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांना पाठिंबा जाहीर केला.
▪️ चौकट
तुम्हाला लाज वाटत असेल आम्हाला आदर आहे
शरद पवार यांच्या सभेच्या फलकावर गोपिनाथ मुंडे व इतर दिवंगत नेत्यांची छायाचित्रे आम्ही छापली. विरोधकांनी त्याचे भांडवल केले. हे दिवंगत नेते जनतेची संपत्ती आहे. तुम्हाला लाज वाटत असेल, मात्र आम्हाला त्यांचा अभिमान आहे.