घनश्याम शेलार यांच्या काँग्रेस आगमनाने पक्षाची जिल्ह्यातील ताकद वाढली : जयंत वाघ
अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर जिल्ह्याच्या राजकारणात आणि प्रदेश पातळीवर एक कुशल संघटक म्हणून सुप्रसिद्ध असलेले धडाडीचे नेतृत्व घनश्याम शेलार यांच्या काँग्रेस आगमनाने पक्षाची नगर जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. घनश्याम अण्णा हे कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध आमच्या उमेदीपासून आहेत. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने नगर जिल्ह्यात पक्षाला एक उभारी प्राप्त झाली असून त्यांच्या निवडीचे मी स्वागत करतो असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत वाघ यांनी म्हटले आहे.
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के सी राव भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी नुकताच काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा प्रवेश खूप महत्त्वाचा मानला जातो. श्रीगोंदा सह नगर जिल्ह्याच्या राजकारणात प्रत्येक निवडणुकीत शेलार यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांच वकृत्व चांगले असुन ते एक फर्डे वक्ते आहेत. यापूर्वी ते उमेदीच्या काळात भारतीय जनता पार्टी आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादीत प्रदेश पातळीवर त्यांनी उल्लेखनीय काम आपल्या उत्कृष्ट संघटन कौशल्याद्वारे करून दाखवले.
संघटनात्मक पातळीवर केडर म्हणून काम करण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांच्या काँग्रेसमध्ये येण्याने पक्षाला नगर जिल्ह्यात बळकटी प्राप्त झाली आहे त्यांच्या राजकारणाचा आणि अनुभवाचा मोठा आधार पक्षाला मिळणार आहे.राजकारणात वर्षानुवर्षे कार्यरत असताना सुद्धा आतापर्यंत त्यांच्यावर राजकीय दृष्ट्या अन्याय झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले आणि राज्याचे नेते मा.बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून आपण शेलार यांना पक्षाच्या पातळीवर मोठी जबाबदारी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वाघ यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्यासोबतही त्यांनी भरीव असे कार्य केलेले आहे त्यांच्या कामाचा उरक चांगला आहे त्यांच्या या अनुभवाचा फायदा पक्षाला निश्चितपणे होईल असे वाघ यांनी म्हटले आहे त्यांच्या निवडीचे त्यांनी स्वागत करून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले आहे.
- Advertisement -