अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनावर मात करण्यासाठी लस ही प्रभावी असून, कोरोनामुक्तीसाठी प्रत्येकाचे लसीकरण आवश्यक आहे. शहरात शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी महापालिका प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वांचे लसीकरण व्हावे या भावनेने महापालिकेने सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लसीकरण कॅम्प सुरु केले असून, नागरिकांना जास्त वेळ रांगेत न थांबवता सहज लस उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपायुक्त यशवंत डांगे यांनी केले.
झेंडीगेट, रामचंद्र खुंट व परिसरातील नागरिकांचे कोरोना लसीकरण होण्याच्या दृष्टीकोनाने घर घर लंगर सेवा, हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने वधवा केअर अॅण्ड क्युअर सेंटर येथे कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात आले.
या शिबीराच्या उद्घाटनाप्रसंही उपायुक्त डांगे बोलत होते. यावेळी घर घर लंगर सेवेचे प्रितपालसिंह धुप्पड, हरजितसिंह वधवा, हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानचे मन्सूर शेख, कैलाश नवलाणी, डॉ.सिमरनकौर वधवा, डॉ. माधुरी गाडे, रमेश गांधी, समीर खड़के, सिस्टर स्नेहल शेलार, सुवर्णा शेलार-खुरांगे, कांतिलाल श्रीरंग आदी उपस्थित होते.
हरजितसिंह वधवा यांनी कोरोना लस घेऊन प्रत्येक नागरिकाने सुरक्षित राहण्याची गरज आहे. लसीकरणाबद्दल चुकीच्या गैरसमजूतींना थारा न देता कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी स्वत:चे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले.मन्सूर शेख यांनी नागरिकांमध्ये जागृकता निर्माण झाली असून, नागरिक लस घेत आहे. कोरोनापासून कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
या लसीकरण शिबीरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांना व्यवस्थित बसवून व संपुर्ण माहिती देऊन त्यांचे लसीकरण करण्यात आले. तर लसीकरण झालेल्या नागरिकांसाठी अल्पोपहाराची देखील व्यवस्था करण्यात आली होती.