अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तहसीलदार यांच्या भ्रष्टाचारप्रकरणी उपोषणानंतर नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयास चौकशी अहवाल प्राप्त झाला असताना सदर तहसीलदारांचे निलंबन करुन जिल्हा बाहेर बदली करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व तालुकाध्यक्ष निवृत्ती कासूटे यांनी नाशिक विभागीय आयुक्तांना दिले. याप्रकरणी कार्यवाही न झाल्यास नाशिक विभागीय आयुक्त कार्यालया समोर 30 ऑगस्टला विविध संघटनांच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करुन बेकायदेशीर कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी 27 जुलै रोजी उपोषण करण्यात आले होते. उपोषणाची दखल घेऊन नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयास चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. पारनेर तहसीलदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
पारनेर तहसीलदारांच्या भ्रष्टाचाराबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. सदर तहसीलदारांनी तक्रारी केल्याचा राग येऊन अनेक सामाजिक कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक आवाज दाबण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले आहे. ही न्यायालयीन बाब असून, तक्रारीबाबत त्याचा कुठलाही संबंध नाही. खंडणीचा गुन्हा दाखल करुन त्या शासनाची दिशाभूल करून केलेला भ्रष्टाचार दाबण्याचे काम करीत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाला असताना सदर तहसीलदारांचे निलंबन करुन त्यांची जिल्हा बाहेर बदली करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रकरणी कार्यवाही न झाल्यास उच्च न्यायालयात देखील जनहित याचिका दाखल करण्याचे म्हंटले आहे.