जामखेड – (प्रतिनिधी नासीर पठाण )
जामखेड, ता. १ : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून जामखेडच्या पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल १३८.८४ कोटी ₹ खर्चास राज्य सरकारने सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांचा विकासकामांचा धडाका सुरूच असल्याचे दिसत असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जामखेडच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
जामखेड शहराचा पाणी प्रश्न हा मतदारसंघात मोठा कळीचा मुद्दा बनला होता. पाच वर्षे मंत्रीपद आणि पालकमंत्री असतानाही प्रा. राम शिंदे यांना हा प्रश्न सोडवता आला नाही. पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीच्या प्रचारात जामखेडला आले असताना संबंधित योजना मंजूर झाल्याचे पत्र दाखवून त्यांनी निवडणुकीला हवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो केवळ निवडणूक फंडा असल्याचेच नंतर स्पष्ट झाले. मात्र रोहित पवार यांनी आमदार झाल्यानंतर या योजनेचा पाठपुरावा करून तांत्रिक मान्यता, सुधारीत तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता आणि प्रत्यक्ष निधी मिळवणे ही सर्व कामे केली. मागील शासनाच्या काळात या योजनेचा केलेला प्रकल्प अहवाल हा खाजगी कन्सल्टंट मार्फत करण्यात आला होता आणि त्यात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. जामखेड शहराचा जवळपास ४० % भाग या योजनेतून वगळण्यात आला होता. तसेच अनेक भागात पूर्ण दाबाने पाणी पोचण्याबाबतही प्रश्नचिन्ह होते. ही बाब लक्षात आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी नाशिकच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांच्याकडील यंत्रणेमार्फत नव्याने प्रकल्प अहवाल तयार करून घेतला. तो करत असताना जामखेडमधील नागरिकांना विश्वासात घेऊन शहरातील वगळलेल्या भागाचा या योजनेत समावेश केला. तसेच पंपाशिवाय तिसऱ्या मजल्यापर्यंत पूर्ण दाबाने पाणी चढेल, अशाप्रकारे या योजनेचा आराखडा तयार केला. त्यामुळे या योजनेच्या प्रकल्पाच्या किंमतीतही वाढ झाली. आमदार रोहित पवार यांनी या वाढीव प्रकल्पास तांत्रिक आणि नंतर मार्च २०२० मध्ये १०६.९९ कोटी रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळवली. परंतु डीएसआर च्या रेटमध्ये बदल झाल्यामुळे या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक होते.
त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकामंत्री एकनाथ शिंदे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून आमदार रोहित पवार यांनी जामखेड पाणीपुरवठा योजनेसाठी १३८ कोटी ८४ लक्ष इतक्या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवली. येत्या दोन वर्षात ही योजना पूर्ण करण्यात येणार असून यामुळे जामखेड शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. याबाबत जामखेडच्या नागरिकांनी आमदार रोहित पवार यांचे आभार मानले.
यावेळी रोहित पवार बोलतांना म्हणाले की
निवडणुकीच्या काळातच जामखेडच्या पाणीप्रश्नाची भीषणता लक्षात आली होती. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी येथील अनेक महिला भगिनींनी माझ्याकडे केली होती आणि मीही त्यांना शब्द दिला होता. आज शब्दपूर्ती करताना अत्यंत समाधान वाटत आहे. शहरातील कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही आणि ही योजना वेळेत पूर्ण करण्यात येईल. यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकासमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री या सर्वांचे रोहित पवार यांनी मनापासून आभार मानले.