टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात रुग्ण महिलांना वाऱ्यावर सोडले : उच्चस्तरिय चौकशी व कारवाईची मागणी

कुटुंब नियोजन कॅम्प’ की ‘छळछावणी’

टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात रुग्ण महिलांना वाऱ्यावर सोडले : उच्चस्तरिय चौकशी व कारवाईची मागणी

नेवासा (कमलेश गायकवाड ) – कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरातील महिलांना शस्त्रक्रियेनंतर शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी वाऱ्यावर सोडून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून या शस्त्रक्रिया झालेल्या महिलांसाठी सदरचे शिबिर छळ छावणी ठरल्याचा आरोप होऊ लागला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून सर्व संबंधितांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप नेते हृषिकेश शेटे यांनी केली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील सर्व नऊ प्राथमिक केंद्रांतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या 110 महिलांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर वडाळा बहिरोबा येथील एफ.जे.एफ.एम. मिशन रुग्णालयात शनिवारी मोठा गाजावाजा करत संपन्न झाला. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर हा शासकीय उपक्रम असल्याने त्यात मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी टार्गेट पूर्ण होण्यासाठी शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोठा आटापिटा केला. यासाठी तालुक्याच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या महिलांना मिशन रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असल्याचा विश्वास या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला.
मात्र प्रत्यक्षात या शस्त्रक्रिया शिबिरातील महिला रुग्णांना साधे पिण्याच्या पाण्याचीही सुविधा उपलब्ध नव्हती. शस्त्रक्रियेनंतर भुलीच्या अंमलाखाली असलेल्या महिला रुग्णांना स्ट्रेचर वरून न नेता त्यांच्या नातेवाईकांमार्फत वॉर्ड मध्ये नेण्यात आले. सदर वॉर्डात या शस्त्रक्रिया केलेल्या महिला रुग्णांना झोपण्यासाठी बेडची व्यवस्थाच नसल्याने त्यांना अक्षरशः अंथरूण – पांघरूण नसलेल्या अवस्थेत उघड्या फरशीवर झोपविण्यात आल्याचे दिसून आले. एक एका वॉर्डात 25 – 30 महिला रुग्णांना जनावरांप्रमाने कोंबण्यात येऊन काही वॉर्डांना बाहेरून दरवाजा कुलूपबंद करून कोंडून ठेवण्यात आल्याचा आरोप या रुग्ण महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे.
अशातच सायंकाळच्या सुमारास वडाळा बहिरोबा येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तर या रुग्ण महिलांच्या त्रासात मोठी भर पडल्याचे दिसून आले. कुठलीही काळजी न घेता झोपविण्यात आलेल्या खोल्यांच्या छतातून गळलेले पावसाचे पाणी या उघड्या फरशीवर बेशुद्धावस्थेत झोपलेल्या या महिला रुग्णांच्या खाली जाऊन त्या पावसाच्या पाण्यात त्या झोपल्याचे संतापजनक चित्र यावेळी दिसून आले. वादळी पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने या अवस्थेत कित्येक तास या रुग्ण महिला हाल अपेष्टा भोगत होत्या. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व जबाबदार आरोग्य अधिकारी अवघ्या दोन स्थानिक महिला परिचारिकांना देखरेखीसाठी नियुक्त करून आपापल्या घरी निघून गेल्याने रुग्ण महिलांच्या नातेवाईकांनी भाजप नेते हृषिकेश शेटे यांच्या कानावर हा प्रकार घातला.
शेटे यांनी तातडीने मिशन रुग्णालय गाठून प्रत्यक्ष पाहणी केली असता हा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचे शिबिर आहे की एखादी छळ छावणी असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी भ्रमण ध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शेटे यांनी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खजेंद्र टेंभेकर यांना या प्रकाराची माहिती देऊन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा धक्कादायक तितकाच चीड आणणारा प्रकार जगासमोर आणला. यानिमित्ताने नेवासा तालुक्यातील आरोग्य विभागाचा असंवेदनशील काळाकुट्ट चेहरा समोर आला असून या शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराची सखोल चौकशी करून संबंधित घृणास्पद प्रकारास जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
प्रत्येकी 2500 रुपये उकळले –
कुटुंब नियोजन शिबिरात सहभागी झालेल्या सर्व 110 रुग्ण महिलांकडून संबंधित मिशन रुग्णालयाने प्रत्येकी 2500 रुपये घेऊन त्यांना कुटुंब नियोजन शिबिराच्या देणगीची पावती दिल्याचे यानिमित्ताने निदर्शनास आले आहे. शासकीय आरोग्य अधिकारी तसेच मिशन रुग्णालय प्रशासनाने संगनमत करून डल्ला मारल्याची तसेच रुग्ण महिलांची सोयी सुविधांअभावी हेळसांड केल्याची चीड यावेळी त्यांचे नातेवाईक करत होते.
गुन्हा दाखल करणार –
याप्रकरणी गरीब गरजू रुग्ण महिलांची असंवेदनशीलपणे हेळसांड केल्याबद्दल मिशन रुग्णालय व्यवस्थापनासह सर्व संबंधित दोषी आढळणाऱ्या शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्यांविरोधात शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची माहिती भाजप नेते ऋषिकेश शेटे तसेच यावेळी उपस्थित आम आदमी पार्टीचे प्रवीण तिरोडकर, काँग्रेसचे संदीप मोटे, भीम शक्तीच्या महिला जिल्हाध्यक्षा शोभाताई पातारे यांनी दिली. संबंधितांवर कारवाईस टाळाटाळ झाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
रात्रीच्या 1 वाजता रुग्णांना हलविण्याची नामुष्की –
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी त्यांच्या सहकाऱ्यांसह रात्री बारा वाजता हडबडलेल्या अवस्थेत मिशन रुग्णालयात दाखल झाले. या रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सर्व सुविधा असल्याची बतावणी केल्यानेच शिबीर घेतल्याचा कांगावा त्यांनी केला. रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णांकडून प्रत्येकी 2500 रुपये घेतल्याचेही त्यांनी यावेळी समर्थन केले. शिंगणापूरचे पोलीस निरीक्षक खजेंद्र टेंभेकर यांनी परिस्थितीचे गांभिर्य विषद केल्यानंतर शासकीय रुग्णवाहिकांना पाचारण करुन रात्रीच्या १ वाजता रुग्ण महिलांना त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्याची नामुष्की शासकीय आरोग्य यंत्रणेवर ओढवल्याचे पहावयास मिळाले
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles