डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगलगेटला नागरिकांची आरोग्य तपासणी
छत्रपती शाहू महाराज संस्था व साईदीप हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम
शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकराजा छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साईदीप हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आरोग्य शिबिराने साजरी करण्यात आली. परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मंगलगेट येथील बौद्ध समाज मंदिरात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील क्षेत्रे, साईदीप हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी संजीव दायमा, सचिव नितीन कसबेकर, उपाध्यक्ष महेश भोसले, पीआरपी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेनेच्या मृणाल भिंगारदिवे, शरद मुर्तुडकर, प्रवीण ठोंबे, अमोल गायकवाड, नामदेव लंगोटे, संदेश वाघमारे, आकाश सरोदे, सागर क्षेत्रे, रमेश सानप, भीमराव पगारे आदी उपस्थित होते.
सुनिल क्षेत्रे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचा जागर होवून, सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी त्यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने गरज आहे. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, हा मुक्तीचा मुलमंत्र त्यांनी दिला. त्यांच्या विचाराने सुशिक्षित होवून हक्कासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेबांनी राज्य घटनेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. या अलौकिक, तेजस्वी आणि वंदनीय महापुरुषांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
साईदीप हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.एस.एस दीपक, डॉ.आर.आर. धुत, डॉ. किरण दीपक, डॉ.राहुल धुत, डॉ. अरुण राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यामध्ये विविध प्रकारच्या आरोग्य तपासणी करुन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. दत्तात्रय बगळे, डॉ. मृणालिनी रसाळ, सिस्टर पुजा पगारे, प्रियंका गायकवाड, संजय भिंगारदिवे यांनी रुग्णांची तपासणी केली. तसेच संध्याकाळी परिसरातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.