डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
प्रत्येक पावलांवर प्रत्येकाची परीक्षा सुरु असते -प्रा.डॉ. रविंद्र चोभे
अहमदनगर (प्रतिनिधी)- प.पू.डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित केडगाव येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच संस्थेच्या प्रांगण्यात गौरव करण्यात आला. या परीक्षेचे हे 32 वे वर्ष होते, जिल्ह्यात विविध परीक्षा केंद्रात झालेल्या या परीक्षेत दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र चोभे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.रावसाहेब पवार यांच्यासह शिक्षणशास्त्र प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा.सोमनाथ दिघे, संस्थेचे सहकार्यवाह ॲड. मुरलीधर पवार, शाळा विभागाचे समन्वयक प्रमिला कार्ले आदी उपस्थित होते.
प्रा.डॉ. रविंद्र चोभे म्हणाले की, विद्यार्थ्यांची प्रज्ञा वाढविण्यासाठी ही परिक्षा घेण्यात येते. परीक्षा ही फक्त विद्यार्थी दशेतच नसते, तर प्रत्येक पावलांवर प्रत्येकाची परीक्षा सुरु असते. त्या परीक्षेला सामोरे जावून प्रयत्नपूर्वक उत्तीर्ण व्हावे लागते. यासाठी गुरुजनांचा सल्ला व आशिर्वाद महत्त्वाचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. तर सक्सेस प्रिन्सिपलचे प्रात्यक्षिक व जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग त्यांनी उलगडून दाखविला.
दादासाहेब काजळे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. मुरलीधर पवार यांनी संस्थेचा परिचय करून दिला. प्रज्ञाशोध परिक्षाचे अहवाल वाचन प्रा.डॉ.शर्मिला पारधे यांनी केले. याप्रसंगी इयत्ता चौथी व सातवी मराठी व इंग्रजी माध्यमाचे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.कुमावत, मुख्याध्यापक संदिप भोर, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चतुर्थी गायकवाड, प्रियांका गर्जे व निशा गोरे यांनी केले. आभार प्रा.डॉ. भांडारकर यांनी मानले.