तीन वर्षीय मुलीचा मनगटापासून पूर्णपणे कापला गेलेला पंजा पुन्हा शस्त्रक्रियेने जोडला

- Advertisement -

तीन वर्षीय मुलीचा मनगटापासून पूर्णपणे कापला गेलेला पंजा पुन्हा शस्त्रक्रियेने जोडला

शहरातील डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव; 11 तास चालली शस्त्रक्रिया

गंभीर परिस्थिती ओढवल्यास वेळेत उपचार गरजेचे – डॉ. आदित्य दमानी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकरी कुटुंबातील तीन वर्षीय अनन्या गदायी ही मुलगी खेळण्यात दंग असताना चुकून तिचा उजवा हात कडबा कुट्टीच्या मशीनमध्ये गेल्याने मनगटापासून पूर्णपणे कापला गेला. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी नगर शहरात आनले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्लास्टिक सर्जन डॉ. आदित्य दमानी यांनी 11 तास शस्त्रक्रिया करुन उजव्या हाताच्या मनगटापासून विलग झालेल्या पंजाला पुन्हा जोडून, तुटलेल्या हाताचा रक्तपुरवठा पुन्हा सुरु केला. तीन वर्षीय शेतकरी कुटुंबातील मुलीचा मनगटापासून विलग झालेला पंजा शस्त्रक्रियेने पुन्हा जोडल्याने डॉ. दमानी व त्यांच्या सहकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  या शस्त्रक्रियेबाबत डॉ. दमानी यांनी सोमवारी शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी भूलतज्ञ डॉ. श्रद्धा दमानी व डॉ. रणजीत सत्रे उपस्थित होते.

1 मार्च रोजी भेंडा ता. नेवासा या गावातील गदायी कुटुंबातील तीन वर्षीय अनन्या खेळात असताना दुर्देवाने तिचा हात कडबाकुट्टीच्या मशीनमध्ये गेला. मनगटापासून कापला गेला पंजा पाहून सर्व कुटुंबीय घाबरले. कुटुंबीयांनी ताबतोब अनन्याला शहरात उपचारासाठी घेऊन आले. डॉ. प्रशांत काळे यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करुन तिला ताबडतोब उपचारासाठी सुयोग प्लास्टिक सर्जरी सेंटर मध्ये डॉ. आदित्य दमानी यांच्याकडे पाठवले. डॉ. दमानी यांनी रुग्णाची परिस्थिती ओळखून वेळ न घालवता ताबडतोब शस्त्रक्रिया सुरु केली. रात्री 8:30 वाजता सुरु झालेली शस्त्रक्रिया सकाळी 7:30 वाजे पर्यंत सुरु होती. यामध्ये पंजा जोडणं, तुटलेल्या नसा जोडणं याचबरोबर त्वचा पुर्ववत करणं गरजेचं होतं यासाठी आवश्‍यक ती सर्व काळजी अग्रक्रमाने घेण्यात आली. या अकरा तासाच्या शस्त्रक्रियेत डॉक्टर व त्यांच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम करुन मनगटापासून कापल्या गेलेल्या पंजाचे स्नायू, शिरा व रक्त वाहिन्या जोडल्या व त्या तुटलेल्या हाताचा रक्तपुरवठा वेळेत सुरु केला. भूलतज्ञ डॉ. श्रद्धा दमानी यांनी या मुलीला अकरा तास भूल दिली. लहान मुलीला एवढ्या वेळाची भूल देणे मोठे अवघड काम होते. हातापासून विलग झालेला पंजा पुन्हा जोडण्याची डॉक्टरांनी केलेली ही शस्त्रक्रीया खुपच मोठे अचिव्हमेंट म्हणावी लागेल.

आजच्या काळात प्लास्टिक सर्जरीने खूप प्रगती केली आहे. प्लास्टिक सर्जरी मध्ये मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी, बर्न सर्जरी, री कंन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, कॉस्मेटिक सर्जरी, हॅण्ड सर्जरी अशा विविध सब ब्रँचेस असतात. अशाप्रकारे गंभीर परिस्थिती ओढवल्यास वेळेत उपचार मिळाल्यास तुटलेले हात व बोट जोडले जाऊ शकतात. मायक्रो व्हॅस्क्युलर सर्जरी ही प्लास्टिक सर्जरीचा एक भाग आहे. यामुळे तुटलेले हात बोट यांचे पुनर्रोपण करणे शक्य आहे. दुर्देवाने असे अपघात झाल्यास डॉक्टरला फोन करून कळवावे. तुटलेले हात व बोट स्वच्छ पाण्याने साफ करावे व ते स्वच्छ कपड्यात प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून त्याला सील करावे. ही पिशवी बर्फाच्या पाण्यात ठेवावी व लवकरात लवकर प्लास्टिक सर्जनकडे शस्त्रक्रियेसाठी घेऊन जाणे आवश्‍यक आहे. चार ते पाच तासात शस्त्रक्रिया सुरु झाल्यास याचे सकारात्मक रिझल्टस येणे शक्य आहे. अशा परिस्थितीमध्ये नातेवाईकांनी देखील डॉक्टरांवर विश्‍वास ठेवणे महत्त्वाचे आहे. -डॉ. आदित्य दमानी (प्लास्टिक सर्जन)

मुलीच्या हाताचा पंजा पूर्णत: कापला गेल्याने संपूर्ण कुटुंबीय निराशेच्या गर्तेत अडकले होते. पुन्हा हाताचा पंजा जुडणार की नाही? मुलीचे भविष्य अशा प्रश्‍नांत सर्व कुटुंबीय चिंतेत असताना डॉ. दमानी देवदूतासारखे मिळाले. त्यांनी केलेली शस्त्रक्रिया न भुतो न भविष्यती आहे. आज मुलीला पाहून समाधान मिळत आहे. डॉक्टरांनी अशा परिस्थितीत मोठा धीर दिला व ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. – ज्ञानेश्‍वर गदायी (मुलीचे वडिल)

डॉ. दमानी यांनी वडोदरा, गुजरात येथील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज येथून प्लास्टिक सर्जरीचे शिक्षण घेतले आहे. 2016 मध्ये एमसीएच पदवी पास मिळाल्यानंतर मुंबई, पुणे, सुरत, वडोदरा व कोयंबतूर येथील विविध सीनियर डॉक्टरांसोबत काम केले व फेलोशिपच्या पदव्या मिळवल्या. त्यानंतर पुण्याच्या रुबी हॉलमध्ये त्यांनी काम केले. त्यांनी मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरीचे प्रशिक्षण तैवान येथील चँग गुंग मेमोरियल हॉस्पिटलच्या प्रसिद्ध डॉक्टर फु चेन वी यांच्याकडून घेतले. मागील एका वर्षापासून ते सुयोग प्लास्टिक सर्जरी सेंटर, लालटाकी रोड येथे व कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये आपल्या सेवा देत आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles