तो उमेदवार सर्वसामान्य चेहरा नसून, या चेहऱ्यामागे अनेक उद्योग -विनायक गोस्वामी
युवा वर्गाला गुन्हेगारीत झोकण्याचे काम करत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकनेता म्हणून मिरवणारे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार सर्वसामान्य चेहरा नसून, या चेहऱ्यामागे अनेक उद्योग सुरु असल्याचा आरोप पारनेर सैनिक बँकेचे सभासद विनायक गोस्वामी यांनी केला आहे.
गोस्वामी म्हणाले की, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या पारनेर सैनिक बँकेत गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल झालेल्यांना पाठबळ देण्याचे व भ्रष्टाचारी संचालक मंडळांना पाठीशी घालण्याचे काम हा लोकनेता करत आहे. जनतेला सर्वसामान्य असल्याचे भासवून त्यांनी पारनेर विधानसभा मतदार संघात अनागोंदी माजवली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पाच वर्षांपूर्वी आमदार म्हणून निवडून येण्यासाठी त्यांनी पारनेरच्या जनतेला सर्वसामान्य असल्याचे दर्शविले. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी गुंडगिरी व दहशतीचे राजकारण केले. सुपा एमआयडीसीला देशोधडीला मिळवून युवा वर्गाला गुन्हेगारीत झोकण्याचे काम ते करत आहे. दक्षिण लोकसभा निवडणुकीत ते निवडून आल्यास दहशत व गुंडशाहीचे प्रस्थ वाढल्याशिवाय राहणार नसल्याचे गोस्वामी यांनी म्हंटले आहे.
पारनेर सैनिक बँकेत कर्जदार असलेल्यांच्या जमीनी सत्ताधारी संचालक मंडळास हाताशी धरुन अत्यंत कमी किमतीत हस्तक, एजंट व स्वतःच्या नावावर घेतल्याचा आरोप केला आहे. सर्वसामान्य जनेतेने सुज्ञ व सुशिक्षित उमेदवाराला निवडून देऊन ही गुंडशाही मोडित काढण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.