श्रीगोंदा प्रतिनिधी – गणेश जेवरे
श्रीगोंदा तालुक्यामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या गस्त पथकाने घुगलवडगाव येथे पकडली. यामध्ये चार संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पाच लाख तीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत घडलेली घटना अशी की,श्रीगोंदा येथील पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त माहिती दाराकडून श्रीगोंदा तालुक्यामध्ये दरोडा टाकण्यासाठी एक टोळी येत असल्याची माहिती समजली, त्यानंतर त्यांनी तात्काळ गस्त पथकांना याबाबत माहिती दिली.
पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील घुगल वडगाव येथे माहिती दिलेला छोटा टेम्पो तिथे येताच पोलीस पथकाने अडविला,टेम्पोत बसलेली दरोडेखोरांच्या टोळी मधील दरोडेखोर सावध झाले व उड्या टाकून पळून जात असताना पोलिसांनी चार जणांना पकडले तर इतर चार जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
पोलिसांनी ज्या चार संशयित दरोडेखोरांना पकडले यात परमेश्वर उर्फ परमेशा वैयशा भोसले राहणार गंगापूर औरंगाबाद,सचिन अशोक जाधव ,महेश किसन धोत्रे दोघीही राहणारा प्रवरा संगम, तालुका नेवासा,राजू शिवाजी जाधव राहणार गंगापुर,औरंगाबाद यांचा समावेश आहे.
यांच्याकडे पोलिसांना कटावणी, नायलॉन दोरी ,सुरा, मिरचीपूड असे दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आले.
या दरोडेखोरांनी याठिकाणी येण्यापूर्वी बेलवंडी येथील भारत गॅस एजन्सीचा वॉचमन व ड्रायव्हर यांना मारहाण करून त्याठिकाणी चोरलेली मोठी केबल यावेळी सापडली.
यापैकी पकडलेला मुख्य सूत्रधार परमेश्वर भोसले याच्यावर कोपरगाव, गंगापूर, शेवगाव या पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, अमित माळी, अंकुश ढवळे, रमेश जाधव, प्रकाश मांडगे, किरण बोरुडे, अमोल कोपनर यांच्यासह कर्मचारी यांनी केली आहे.