जिल्हाधिकारी कार्यालया समोर काळे कपडे परिधान करुन ठिय्या
आरोपी नराधमांना सहा महिन्याच्या आत फाशीची शिक्षा देण्याची मागणी
तृतीय पंथीयांचा आंदोलनात सहभाग
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन दिल्ली येथे पोलीस कर्मचारी व मुंबई साकीनाका मधील युवतीवर झालेल्या बलात्कार घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून व काळे पट्ट्या डोक्यावर बांधून जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठिय्या मांडून निदर्शने केली. बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून सहा महिन्याच्या आत फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात तृतीय पंथीयांनी देखील सहभाग नोंदवून आरोपींना फासावर लटकवण्याच्या घोषणा दिल्या.
या आंदोलनात रिपाई अल्पसंख्यांक विभागाचे शहर कार्याध्यक्ष आजीम खान, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, नईम शेख, जमीर इनामदार, वर्षा रत्नपारखी, जावेद सय्यद, विकी प्रभळकर, संतोष पाडळे, पप्पू डोंगरे, सोनू भंडारी, शंकर कदम, गुलाम शेख, शहेबाज शेख, बंटी बागवान, दिनेश पाडळे आदिंसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
खैरलांजी, कोपर्डी मधील नराधम आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा झाली असती तर, अशा प्रकारे मानवतेला काळिमा फासणार्या घटनांना अळा बसला असता. देशामध्ये महिलांवर बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. गुन्हेगारांना पोलिसांचा वचक व कायद्याचा धाक राहिला नसल्याने असे कृत्य करण्याचे धाडस वाढत आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पोलिस कर्मचारी असताना देखील सदर युवतीवर बलात्कार झाला. ही घटना झालेली असतानाच मुंबई साकीनाका येथे युवतीवर अमानवी स्वरूपाचे अत्याचार करण्यात आले असून, या घटनेचा आरपीआय तीव्र निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यासाठी सदर खटले जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना सहा महिन्याच्या आत फाशीची शिक्षा मिळणे आवश्यक आहे. बलात्कार प्रकरणातील निर्भयांना न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करुन त्यामध्ये बलात्काराचे खटले चालवून आरोपी नराधमांना सहा महिन्यामध्ये फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्याची मागणी आरपीआय अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.