दिव्यांग ज्येष्ठ पत्रकार धोपावकर यांनी पूर्ण केली अर्ध मॅरेथॉन
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने गौरव
अर्ध मॅरेथॉन दुसऱ्यांदा पूर्ण करणारे एकमेव अंध धावपटू
अहमदनगर (प्रतिनिधी) – डोळ्याने दिसत नसतानाही जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर 21 किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन 3 तास 35 मिनीटात पूर्ण करणारे ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांचा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला. शहर स्थापना दिनानिमित्त या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत धावणारे ते एकमेव अंध धावपटू होते.
मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख व पत्रकारांच्या नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम यांनी धोपावकर यांचा सत्कार केला. यावेळी परिषदेचे राज्य प्रसिध्दीप्रमुख संदीप कुलकर्णी उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार धोपावकर डोळ्याने दिसत नसतानाही सदृढ व निरोगी आरोग्याचा संदेश देत धावण्याच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतात. मित्रांच्या सहकार्याने दररोज ते 5 कि.मी. धावण्याचा सराव शहरातील रेसीडेन्शिअल विद्यालयाच्या मैदानावर करतात. मॅरेथॉनमध्ये धावणारे ते देशातील दुसरे अंध धावपटू आहेत. अंध असताना देखील विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन त्यांनी यश प्राप्त केल्याचा सन्मान म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. तर धोपावकर यांना या पुढील मॅरेथॉनसाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पूर्णत: सहकार्य राहणार असल्याची ग्वाही मन्सूर शेख यांनी दिली.
सत्काराला उत्तर देताना अजय धोपावकर म्हणाले की, ज्येष्ठ व अंध धावपटू म्हणून मॅरेथॉनमध्ये धावताना जागतिक रेकॉर्ड करण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने पुढे सराव करणार आहे. शहरात विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन ती स्पर्धा पूर्ण केली व दुसऱ्यांदा हाफ मॅरेथॉन पूर्ण केल्याचा आनंद आहे. मोठ्या शहरातही मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन ती पूर्ण करण्याचा मानस आहे. सुदृढ व्यक्तींना व्यायामाचा संदेश देऊन त्याचे महत्त्व पटविण्यासाठी मॅरेथॉनच्या माध्यमातून आवाहन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.