दोन मुलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी प्रवीण गीतेवर युवक काँग्रेस कडून निलंबनाची कारवाई
अहमदनगर (प्रतिनिधी) – नवनागपूर येथे दोन मुलांची नग्न धिंड काढून त्यांना मारहाण प्रकरणातील आरोपी असलेले प्रवीण गीते यांची शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया व क्रीडा विभागाच्या पदाधिकारी पदापासून व पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. गीते यांनी केलेले कृत्य अत्यंत दुर्देवी व निंदनीय बाब असून, याचे काँग्रेस पक्ष समर्थन करत नसल्याचे स्पष्ट करुन युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांनी निलंबनाचे पत्र काढले आहे.
नुकतेच नवनागपूर येथे दोन मुलांची नग्न धिंड काढून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण गीते व त्यांचे चार-पाच सहकारी यांचा सहभाग आढळून आलेला आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी सदर आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घडलेल्या निंदनीय घटनेचा काँग्रेस पक्ष अजिबात समर्थन करत नाही किंवा सदर आरोपी पक्षाचा पदाधिकारी असला तरी त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केले जाणार नाही. पक्षाची प्रतिमा कलंकित करू पाहणाऱ्या सदर पदाधिकारी प्रवीण गीते यांची पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे म्हंटले आहे.