अहमदनगर प्रतिनिधी – धार्मिकस्थळांमधून नेहमीच समाजाला दिशा देण्याचे काम झालेले आहे,अशा धार्मिक स्थळांना मनपाच्यावतीने जादा आलेला कर कमी करण्यासाठी आपण पुढाकार घेऊन नियमाप्रमाणे कर आकारणी होण्यासाठी प्रयत्नशील आहोत.त्यामुळे अनेक धार्मिक स्थळांना योग्य कर आकारणी होऊ लागली आहे. त्यामुळे मनपाच्या कर उत्पन्नातही वाढ झाली आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली ही प्रकारणे आता मार्गी लागत आहे.केडगांव येथील शाही मस्ज़िदला जादा आलेला कर माफ झाल्याने येथील धार्मिक कार्यास हातभार लागण्यास मदत झाली आहे.
शहरातील कोणत्याही धार्मिक स्थळांना कराबाबत शंका असल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.
केडगाव येथील शाही मस्ज़िद ट्रस्टला मालमत्ता कर माफीचे पत्र नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते ट्रस्टच्या पदाधिकार्यांकडून देण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे मौलाना मोहसिन रजा, हाजी अकबर पठाण, जावेद पठाण, हमीद भाई, अतिश पठाण, राजू पठाण, हाजी मनियार, हाजी मनूरअली, परेश लोखंडे, नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले, संग्राम कोतकर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी हाजी अकबर पठाण म्हणाले, गेल्या अनेक महिन्यांपासून बाळासाहेब बोराटे यांनी शहरातील सर्वच धार्मिक स्थळांच्या कराबाबत अभ्यासपूर्ण वस्तूस्थिती मांडून मनपाच्यावतीने जादा आलेला कर कमी करुन दिला आहे.आमच्याही मस्ज़िदला आलेला मनपाचा सुमारे २ लाख ३१ हजार रुपयांचा कर माफ करण्यात आला असल्याने मोठा दिलासा ट्रस्टला मिळाला असल्याचे सांगून बाळासाहेब बोराटे यांचे आभार मानले.
यावेळी नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले,संग्राम कोतकर यांनी सांगितले की, केडगांव भागातील मंदिर, मस्जिद, चर्च आदि धार्मिक स्थळांना मनपाचा जादा कर आला असल्यास त्यांनी आमच्या संपर्क साधावा. या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करु, असे सांगितले.