बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिरात तुळजापुरला जाणाऱ्या पालखीचे भक्तिभावाने स्वागत
अहमदनगर प्रतिनिधी – दिपक कासवा
नवरात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र तुळजापुरला जाणाऱ्या पालखीचे आगमन मंगळवारी सकाळी तीसऱ्या माळेला बुऱ्हाणनगर ( ता. नगर ) येथे उत्सहात झाले. येथील श्री अंबिका तुळजाभवानी मंदिराचे पुजारी भगत कुटुंबीयांकडून तुळजापुर पालखीचे उत्साहात व भक्तिभावाने स्वागत व पूजन करण्यात आले. यावेळी मंदिराचे पुजारी अॅड. विजय भगत व सौ.दुर्गा भगत यांनी साडीचोळी, पुष्पहार अर्पण करून पालखीची विधिवत पूजा केली. पुजारी अॅड.अभिषेक भगत व कविता भगत यांनी पालखीची आरती केली. यावेळी आईराजा उदोउदो…, सदानंदीचा उदोउदो…, बोल तुळजाभवानी माताकी जय… असा जयघोष उपस्थित शेकडो भाविकांनी केला.
दुपारी बारा वाजेनंतर तुळजापुरच्या पालखीची मंदिरास प्रदक्षिणा झाल्यावर वाजत गाजत गावातून मिरवणुक काढण्यात आली. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. गावत पालखीचे स्वागत करण्यासाठी महिलांनी घरासमोर आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. घरोघरी पालखीची पूजा करण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठया प्रमाणात तैनात होता. तत्पूर्वी सकाळी तुळजाभवानी देवीची पुजारी भगत कुटुंबीयांनी पारंपारिक पद्धतीने महापूजा केली. यावेळी देवीस परिधान केलेले उंची वस्त्रे, सुवर्ण व रजत अलंकार, आकर्षक पुष्पमाळांमुळे देवीच्या मूर्तीची प्रसन्नता अधिच वाढली होती. यात्रेनिमित्त देवीच्या देव्हाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
यावेळी पुजारी अॅड. अभिषेक भगत म्हणाले, कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पालखीचा मान गेल्या एक हजाराहून अधिक वर्षांपासून बुऱ्हाणनगरच्या भगत कुटुंबीयांकडे आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथे विजयादशमीला तुळजाभवानी देवीचे सीमोल्लंघन नगरहून गेलेल्या याच पालखीमधून दरवर्षी होत असते. आज तिसऱ्या माळेच्या उत्सवाला संपूर्ण राज्यातून मोठ्याप्रमाणात भाविक बुऱ्हाणनगर येथे आले आहेत. सर्व भाविकांची मनोकामना पूर्ण करणारी ही देवी असल्याने भाविकांची मोठी श्रद्धा देवीवर आहे. देवीच्या आशीर्वादाने सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.
अमोल जाधव म्हणाले, बुऱ्हाणनगर येथे नवरात्रीच्या यात्रे निमित्त सर्वत्र भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तुळजापूरच्या देवीचे माहेर असलेल्या बुऱ्हाणनगर मध्ये पालखीचे आगमन झाल्यावर येथील भगत कुटुंबीयांनी मोठ्या भक्तिभावाने या पालखीचे स्वागत केले आहे. या पालखीची आरती करण्याचा संधी आज मिळाल्याने मी भाग्यवान आहे.
यावेळी रोहीदास कर्डिले, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, देविदास कर्डिले, राजेंद्र भगत, अंजली भगत, किरण भगत, मनीषा भगत, सुभाष भगत, सुनंदा भगत, ऋषिकेश भगत, अॅड.अजिंक्य भगत, वैभवी भगत, कुणाल भगत, अंकिता भगत, अॅड.संकेत भगत, अक्षता भगत व वेद भगत आदी उपस्थित होते.