नवरा नवरी यांना मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्यास केला मज्जाव.
मारहाण करत खोटे गुन्हे दाखल करून धमक्या देत असल्याचा आरोप.
फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस अधीक्षकांची भेट.
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा फॅक्टरी येथील सौ.सीमा शशिकांत ससाने यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझा मुलगा याचे नवीन लग्न झाल्याने नवरी व नवरदेव हे गावातील मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असताना आरोपी सुशांत गुंजाळ, कमलेश गुंजाळ, संदीप गुंजाळ, सिद्धेश गुंजाळ, शुभम कुसेकर व इतर 15 ते 20 अनोळखी व्यक्तींनी मज्जाव करत मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली या घटनेची फिर्याद श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे दाखल केलेली असून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल असताना सुद्धा अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी वरील आरोपींना अटक न केल्यामुळे आरोपीचे मनोधैर्य वाढलेले आहे. त्यामुळे अनिकेत ससाने हा जबर जखमी झाला असून जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे उपचार घेत होता. उपचार घेत असताना वरील आरोपी हे रुग्णालयात येऊन मुलाला धमकावून फिर्याद मागे घ्या अन्यथा तुम्हाला गावामध्ये राहू न देता तुम्हाला मारून टाकु अशी धमकी दिली. वरील आरोपी हे पैशाने धन दांगट असून ते गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे कुटुंबाच्या जीविताचे काही बरे वाईट झाल्यास वरील आरोपी हे जबाबदार राहणार असून लवकरात लवकर वरील आरोपींना अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई करून खोटे गुन्हे दाखल केलेले मागे घेण्याचे मागणीसाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी सीमा ससाने, संदीप ससाने, अनिकेत ससाने, शशिकांत ससाने, कमल ससाने, कामिनी सकट, संदीप सकट, सुनील सकट, चंद्रकांत ससाने, मातंग एकता आंदोलनाचे चंद्रकांत काळोखे, अनुसूचित जाती मोर्च्याचे जिल्हा अध्यक्ष सुनील उमाप, भीमशक्ती जिल्हा संघटक पीटर सुतार, साहेबराव काते आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.