कर्जत प्रतिनिधी – पुढील राजकीय धोरणानुसार व नियोजनानुसार आज भाजपाचा राजीनामा देऊन पक्ष सोडत असल्याची घोषणा भाजपाचे नेते समजले जाणारे कर्जत नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी करून कर्जत तालुक्यात गेली अनेक दिवस चर्चेत असलेल्या पक्षीय उलटफेराचा आज नवा अध्याय लिहिला.
नामदेव राऊत यांनी आपल्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सुपूर्त केला असून याबाबत पत्रकार परिषद घेत घोषणा करताना भाजपातील कोणावरही नाराज नाही आगामी काळात राष्ट्रवादीत विनाशर्त जाण्याबाबत चर्चा झाली असल्याचे जाहीर केले.
कर्जत येथे भाजपा नेते नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की आपल्याला भाजपाच्या विचारधारेप्रमाणे काम करत असतांना भरीव असे काम केले, या काळात अनेक जीवाचे मित्र मिळाले खूप काही शिकण्यास मिळाले आहे. माजी मंत्री प्रा. राम शिंदे, खा. सुजय विखे, शिवाजी कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, स्व. दिलीप गांधी, सुवेंद्र गांधी, अॅड. अभय आगरकर आदींचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले, प्रा. राम शिंदे यांच्या कामाबद्दल व त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी समाधानी असल्याचे सांगत, आगामी काळातील आपल्या राजकीय धोरणानुसार व नियोजनानुसार आपण निर्णय घेत असून आ रोहित पवार हे महाराष्ट्रातील उगवते नेतृत्व असून त्याचे मतदार संघातील काम पाहता लवकरच सहकार्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले.
नामदेव राऊत यांनी भाजपात विविध पदावर काम केले होते त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्या नगर पंचायत निवडणुकीत भाजपाने १२ जागा मिळवून सत्ता मिळवत प्रथम नगराध्यक्ष राऊत यांनाच केले होते, याशिवाय जिल्हा व राज्य पातळीवर पक्षीय पातळीवर ही त्यांना संधी देण्यात आली होती, माजी मंत्री ना. प्रा राम शिंदे यांच्या मंत्रिपदाचा काळात राऊत यांचे शिवाय भाजपातील पान हालत नव्हते, त्यामुळे कर्जत जामखेड मतदार संघात भाजपावर त्याचा नक्कीच परिणाम होणार आहे. मात्र राऊत यांच्या कार्यपद्धती व गेली काही दिवसातील चर्चेनुसार भाजपातील माजी मंत्री प्रा शिंदे व खा सुजय विखे यांनी याची तयारी ठेवली होती, राऊत यांच्या बाबत विखे यांनी एक वाक्य वापरून पूर्वीच याबाबतचे संकेत दिले होते त्यामुळे राऊत यांच्या या घोषणेवर भाजपाची काय प्रतिक्रिया येते हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.
नामदेव राऊत यांनी कर्जतच्या राजकारणाला शिवसेनेतून सुरुवात केली होती, त्यांनी शिवसेनेतुन राष्ट्रवादीत प्रवेश करत पंचायत समितीची निवडणूक लढवली होती, मात्र तेथील पराभवानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करत आपल्या कार्यपद्धतीने पक्षाला आपल्या ताब्यात घेतले होते, मात्र अनेक वर्षांच्या यशस्वी कामकाजानंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत देऊन स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला असून त्यात त्याचा व राष्ट्रवादीचा किती फायदा होतो की तोटा हे काळच ठरविणार आहे.
- Advertisement -