निमगाव वाघात उभारला जातोय कुस्ती प्रशिक्षण केंद्र
कुलगुरु सोनवणे यांचे प्रशिक्षण केंद्रासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन
सर्वसामान्य वर्गातील मुला-मुलींना कुस्तीचे धडे दिले जाणार – पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील कुस्तीपटू घडविण्यासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे उभारण्यात येत असलेल्या कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे कुलगुरु संजीव सोनवणे यांच्याशी चर्चा करण्यात आली. कुस्ती केंद्राचे पै. नाना डोंगरे यांनी गावात उभारण्यात येत असलेल्या कुस्ती प्रशिक्षण केंद्राची माहिती दिली. यावेळी आरटीओ भाऊसाहेब कदम, भाऊसाहेब ठाणगे, इंजि. राजेंद्र सोनवणे, इंजि. विजय सोनवणे, संतोष कदम, वसंत कोके आदी उपस्थित होते.
कुलगुरु संजीव सोनवणे म्हणाले की, नगर तालुक्यासह ग्रामीण भागातील मुला-मुलींना कुस्ती क्षेत्रात पुढे आणण्याचे कार्य पै. नाना डोंगरे यांनी केले. दोन्ही मुली राष्ट्रीय कुस्तीपटू म्हणून घडविल्या तर मुलगा देखील चांगला मल्ल आहे. अनेक कुस्तीपटूंना मार्गदर्शन ते करत असून, गावात उभे राहत असलेल्या कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून चांगले कुस्तीपटू निर्माण होऊन निरोगी व सुदृढ पिढी घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर या प्रशिक्षण केंद्राला सर्वपरीने मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, कुस्ती प्रशिक्षण केंद्रात सर्वसामान्य वर्गातील मुला-मुलींना कुस्तीचे धडे दिले जाणार आहे. होतकरु खेळाडूंना मोठ्या शहरात जाऊन प्रशिक्षण घेणे आर्थिक परिस्थिती अभावी शक्य होत नाही. या प्रशिक्षण केंद्रातून सर्वसामान्यांची मुले घडविण्याचे काम केले जाणार आहे. मातीचा आखाडा व मॅटवर कुस्तीपटूंना शास्त्रोक्त कुस्तीचे धडे देऊन त्यांचा आहार, विहार व व्यायामाकडे लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.