निमगाव वाघात गुरुवारी श्री बिरोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन
बिरोबा मंदिराला रंगरंगोटी व विद्युतरोषणाईची सजावट
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार (दि.2 मे) गावात यात्रा उत्सव व शुक्रवारी (दि.3 मे) कुस्त्यांचे मैदान घेण्यात आले असून, संध्याकाळी करिमशहा वली बाबांचा संदल-उरुस होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.
नुकतेच गावातील युवकांनी गंगाजल आणण्यासाठी रविवारी (दि.28 एप्रिल) रात्री पारंपारिक वाद्यांसह मिरवणूकीने कावड घेऊन प्रवरा संगमकडे प्रस्थान केले. गावातील युवकांचा जथ्था कावडी घेवून गुरुवारी यात्रेच्या दिवशी सकाळी 8 वा. गावात परतणार असून, मोठ्या उत्साहात कावडीची गावामधून डफ, ढोल, ताशे व लेझीम पथकासह मिरवणूक काढली जाणार आहे. सकाळी 10 वाजता श्रीबिरोबा महाराजांच्या मूर्तीस गंगाजलाने अभिषेक घालून विधीवत पूजा केली जाणार आहे. तर मागील वीस वर्षापासून कावडीने गंगाजल आणण्यासाठी जाणाऱ्या युवकांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने केला जाणार आहे. सालाबाद प्रमाणे होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री 9 वाजता छबीना मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत आसमंत उजळून निघणार आहे.
यात्रेनिमित्त गावातील बिरोबा मंदिराला रंगरंगोटी करुन, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गावात कुस्त्यांचे मैदान रंगणार आहे. तर संध्याकाळी करिमशहा वली बाबांचा संदल-उरुस होणार आहे. गावातील यात्रा व संदल-उरुसच्या कार्यक्रमातून धार्मिक एकतेचे दर्शन घडणार आहे. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन देवाचे भगत नामदेव भुसारे, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, बाबा जाधव, अनशाबापू शिंदे, बाबा पुंड, बबन कापसे, रामदास वाखारे, पांडूरंग गुंजाळ, बशीर शेख, संजय डोंगरे, ठकाराम शिंदे, अंबादास निकम, मेजर शिवाजी पुंड, बबन शेळके, संदीप डोंगरे, भानुदास ठोकळ, वसंत फलके, संजय कापसे, गुलाब केदार, वैभव फलके, किरण जाधव, नवनाथ जाधव, रावसाहेब भुसारे, राजू शेख, दिलावर शेख, आदम शेख आदींनी केले आहे. यात्रा उत्सव व संदल-उरुस यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.