निमगाव वाघात वृक्षरोपणाने शिवराज्याभिषेक दिन साजरा
वृक्ष संवर्धनाचा विद्यार्थ्यांनी केला संकल्प
वृक्ष जगले तर सजीव सृष्टी वाचणार – पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, नवनाथ विद्यालय व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिन वृक्षरोपणाने साजरा करण्यात आला.
शाळेच्या प्रांगणात वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, तृप्ती वाघमारे, यश कापसे, प्रतिक ठाणगे, कृष्णा जाधव, विराज निमसे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, प्रतिभा डोंगरे, मंदाताई डोंगरे, सार्थक ठाणगे, कोमल जाधव, हर्षदा शिंदे, अनुष्का फलके, आदिती तरटे, संदेश जाधव आदी उपस्थित होते.
प्रारंभी नवनाथ विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. लावलेली झाडे जगविण्यासाठी वृक्ष संवर्धनाचा संकल्प विद्यार्थ्यांनी घेतला. पै. नाना डोंगरे म्हणाले की, पर्यावरण हा जागतिक प्रश्न बनला असून, वृक्षरोपणाशिवाय पर्याय राहिला नाही. वृक्ष जगले तर सजीव सृष्टी वाचणार असल्याने, प्रत्येकाने वृक्षरोपण करणे काळाची गरज बनली असल्याचे सांगितले.
उत्तम कांडेकर म्हणाले की, काही क्षणिक सुखांसाठी पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आपल्या पुढील वंशाचे अस्तित्व वृक्षरोपण व संवर्धनावर अवलंबून आहे. पर्यावरणाचे समतोल बिघडल्याचा फटका शेतकऱ्यांना देखील बसला आहे. अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पै. संदिप डोंगरे यांनी शिवरायांचा आदर्श घेऊन समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनले असून, त्या काळात शिवाजी महाराजांनी देखील पर्यावरण संवर्धनासाठी केलेले कार्य आज प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे व जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.