निमगाव वाघा येथे शाळेचा पहिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा
विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वितरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात शाळेचा पहिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक कोंडीभाऊ फलके, माजी सरपंच साहेबराव बोडखे, भागचंद जाधव, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मंदा साळवे, प्रशांत (राम) जाधव, प्रमोद थिटे, भानुदास लंगोटे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, तृप्ती वाघमारे, मयुरी जाधव, तेजस केदारी, लहानबा जाधव आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात उत्तम कांडेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सम्रग शिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठ्यपुस्तक व गुलाबपुष्पाचे वाटप करण्यात आले. नाना डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना स्वत:ची परिस्थिती बदलण्यासाठी व देशाच्या भवितव्यासाठी उच्च शिक्षित होण्याचे आवाहन केले. साहेबराव बोडखे व कोंडीभाऊ फलके यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.