निसर्ग स्वातंत्र्य रक्षा लढा अधिक व्यापक करण्यासाठी वकील संघटनेचा प्रयत्न
पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांना निसर्ग रक्षा सैनिक म्हणून दिली जाणार मानवंदना
अहमदनगर (प्रतिनिधी) – निसर्गाला ग्लोबल वॉर्मिंगच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अहमदनगर वकील संघाने पुढाकार सुरु ठेवला असून, निसर्ग स्वातंत्र्य रक्षा लढा अधिक व्यापक करण्यासाठी वकील संघटनेचा प्रयत्न सुरु आहे. पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्यांना निसर्ग रक्षा सैनिक म्हणून 11 जूनच्या कार्यक्रमात मानवंदना दिली जाणार असल्याची माहिती अहमदनगर वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. महेश शेडाळे व ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
स्वातंत्र्य लढ्यात हजारो वकिलांनी मोठी कामगिरी केली, त्याची पुनरावृत्ती निसर्ग स्वातंत्र्य लढा सुरू करून अहमदनगर वकील संघाने सुरू ठेवली आहे. 11 जून रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. राजेश कावरे, ॲड. बबन सरोदे, ॲड. सुभाष भोर, ॲड. समीर पटेल इत्यादींना निसर्ग रक्षा सैनिक म्हणून मानवंदना दिली जाणार आहे.भारतासह जगभर सगळीकडे सिमेंटची जंगले तयार होत आहे. पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असून, ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न टोकाला गेला आहे. यातून सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
अहमदनगर वकील संघाने निसर्ग स्वातंत्र्य लढा जारी केला आहे. त्यातून न्यायालयाच्या आवारात प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. जिल्हा न्यायालय सिमेंटच्या जंगल स्वरूपात होते, त्याचे रूपांतर निसर्गरम्य अशा परिसरात झाले आहे. यंदाच्या जून महिन्यात जिल्हा न्यायालयाच्या समोरील बुऱ्हाणनगरकडे जाणाऱ्या बेलेश्वर चौकापर्यंत पाचशे झाडे लावण्याचा संकल्प निसर्ग रक्षा सैनिकांनी केला आहे.
वकील संघाच्या जाहीर कार्यक्रमात शेकडो निसर्गपाल वकील व निसर्गाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने लहान मुलांना बाल निसर्गपाल म्हणून शपथ दिली जाणार आहे. या उपक्रमातून शहरातील हजारो निसर्गपाल व बाल निसर्गपाल सहभागी करुन घेण्यासाठी अहमदनगर वकील संघ प्रयत्नशील असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.