नेवासा तालुका वकील संघाच्या शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
नेवासा येथील वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करुन तपास करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी) – नेवासा येथील वकील ॲड. मनोज आप्पासाहेब दौंड यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणाचा तपास करुन आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि.1 जुलै) नेवासा तालुका वकील संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी अध्यक्ष ॲड. कल्याण पिसाळ, उपाध्यक्ष ॲड. वैभव वाकचौरे, ॲड. बन्सी सातपुते, सचिव ॲड. राजेंद्र नेव्हल, सहसचिव ॲड. महेश लवांडे, खजिनदार ॲड. देवदान जावळे, ॲड. अमोल कराळे, ॲड. संतोष शेटे, ॲड. भारतभूषण जगन्नाथ मौर्य, ॲड. प्रदीप वाखुरे, ॲड. गणेश निकम, ॲड. प्रशांत माकोने, ॲड. चंगेडिया, ॲड. अजित वाबळे, ॲड. अलका जंगले, ॲड. महेश बोरुडे, ॲड. बाळासाहेब पावळे, ॲड.जयदीप नजन, ॲड. पारसकुमार नहार, ॲड. सचिन घोडेचोर, ॲड. सोमनाथ वाकचौरे, ॲड. संजय शिंदे आदी उपस्थित होते.
नेवासा वकील संघाचे सदस्य ॲड. मनोज आप्पासाहेब दौंड यांच्यावर 28 जून रोजी रात्री साडेबारा च्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करून गावठी बंदुकीचा कट्टा त्यांच्या डोक्याला लावून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. याप्रकरणी ॲड. दौंड यांनी सोनई पोलीस स्टेशन येथे तात्काळ फिर्यादी दिली होती. फिर्याद दिल्यानंतर देखील पोलीस स्टेशनकडून आरोपीबाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सदर आरोपी हा वाळू माफिया असून, त्याची मौजे पानेगाव (ता. नेवासा) येथे मोठी दहशत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
नेवासा तालुक्यात वाळू तस्करांनी थैमान घातले असताना गुन्हेगारी वाढली आहे. पोलीस प्रशासन वाळू तस्करांकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांचे फावले जात आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचा आरोप शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आला.
या प्रकरणातील आरोपी फरार असून, त्यांना तात्काळ अटक व्हावी, या प्रकरणाचा सखोल तपास करावा व वकिलांना उध्दटपणाची वागणुक देणाऱ्या नेवासा येथील पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी नेवासा तालुका वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे.