वंचित बालकांना विविध खेळाचे साहित्य भेट
अहमदनगर(प्रतिनिधी)- मुलांचे वाढदिवस थाटामाटात साजरे करण्याच्या पध्दतीला फाटा देऊन पूजा आणि रोहित सिताराम परदेशी या दाम्पत्याने आपल्या चिरंजीव आझाद या मुलाचा तिसरा वाढदिवस स्नेहालयातील मुलांसह साजरा केला.
या कार्यक्रमाला सामाजिक भावनेची जोड देत त्यांनी वंचित बालकांना कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ, क्रिकेट, दोर उडी खेळाचे साहित्य भेट दिले.
परदेशी परिवाराच्या वतीने अनेक सुख, दु:खाच्या कार्यक्रमात स्नेहालय तसेच शहरातील विविध सामाजिक संस्थांना सामाजिक भावनेने मदत दिली जाते. त्याचाच भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच मुलाचा पहिला वाढदिवसही या संस्थेत साजरा करुन मुलांना दीड टन टरबुजाचे वाटप करण्यात आले होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना मदत करण्याचे आवाहन परदेशी कुटुंबीयांनी केले आहे.
भारतीय लष्करात कार्यरत असलेले वडिल सिताराम परदेशी यांचे बालपण आणि शिक्षण संत गाडगे महाराज छत्रवास या नगर मधील वंचित बालकांच्या संस्थेत गेले असल्याने तसेच आई ज्योती सिताराम परदेशी या अहमदनगर तालुक्यातील बाराबाभळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असल्याने वंचितांशी नाते जोडण्याची परंपरा या कुटुंबाने राखली आहे.
यातूनच रोहित परदेशी यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून वंचितांना खेळाचे साहित्य भेट देऊन वंचित घटकातील मुलांना सामाजिक भावनेने खेळाला प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे.