अहमदनगर प्रतिनिधी – तिळवण तेली समाज ट्रस्टने नेहमीच सामाजिक दायित्व जपले आहे. ट्रस्टच्यावतीेने राबविण्यात येत असलेले उपक्रम हे समाजाभिमुख असतात. त्यातून समाजोन्नत्तीचे काम होत आहे. समाजातील गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांच्या उन्नत्तीसाठी कार्य होणे आज गरजेचे आहे. पवन नागरी पतसंस्थेच्यावतीनेही सर्वसामान्यांना यांच्या गरजा ओळूखन त्यांची आर्थिक उन्नत्ती साधली आहे. तिळवण तेली समाज ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झालेले सागर काळे हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले व्यक्तीमत्व आहे. आता या पदाच्या माध्यमातून ट्रस्ट च्यावतीने उपक्रम राबवून प्रगती साधतील, असे प्रतिपादन पवन नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दिपक भागवत यांनी केले.
पवन नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने तिळवण तेली समाज ट्रस्टच्या अध्यक्षपदी सागर काळे व विश्वस्तपदी सौ.शोभना धारक यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन दिपक भागवत, व्हाईस चेअरमन अभय काळे, संचालक प्रसाद शिंदे, बाळासाहेब हुच्चे, निशिकांत शिंदे, गोपाल वाधवानी, किरण धारक, संजय धोकरिया, जालिंदर चौरे, मनोज क्षीरसागर, संदिप पडोळे, सागर सातपुते, नंदकुमार गुरसाळे, शारदा डोळसे, मधुरा जोशी, दत्तात्रय डोळसे, व्यंकटेश जोशी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सागर काळे म्हणाले, तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने सभासदांच्या हिताबरोबर समाजातील गरजूंना नेहमीच मदतीचा हात दिला आहे. ट्रस्टचे सर्वच पदाधिकारी हे ट्रस्टच्या उपक्रमातून चांगले काम करत आहे. अध्यक्षपदी दिलेली जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन यशस्वीपणे सांभाळू. पवन नागरी पतसंस्थेच्यावतीने केलेल्या सत्कारामुळे आपणास काम करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय काळे यांनी केले तर निशिकांत शिंदे यांनी आभार मानले.