पांढरीचा पूलावर होणारे अपघात रोखण्यासंदर्भात उपाययोजना करा
सह्याद्री छावा संघटनेची मागणी
अन्यथा पांढरी पुलावर ग्रामस्थांसह रास्ता रोकोचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- घाट माथ्याशी असलेले पांढरीचा पूल येथे वाढत चाललेले अपघात रोखण्यासंदर्भात जागतिक बँक प्रकल्पा अभियंता यांनी रस्ते व सुरक्षा उपाययोजनाची अंमलबजावणी करण्याची मागणी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यालयात देण्यात आले. तर अपघात रोखण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना न झाल्यास पांढरी पुलावर ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पांढरीचा पूल (ता. नेवासा) हे ठिकाण घाट माथ्याशी असून, या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. या ठिकाणी वाहतुक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने उपाययोजना करण्यात आली नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघातामध्ये अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले असून, काहींना अपंगत्व आलेले आहे. सदर ठिकाणी रस्ते विभागाकडून योग्य ती काळजी, सुरक्षा उपाययोजना न घेतल्यामुळे सदरचे अपघात होत आहे. अपघाता रोखण्यासंदर्भात योग्य ती उपाययोजना करण्यासाठी दिशादर्शक फलक, गतिरोधक, गावचे चिन्ह बसविणे आवश्यक आहे.
सदरील सोयी-सुविधा नसल्यामुळे सदर परिसरामध्ये सतत अपघात होत आहे. या अपघाताच्या समस्येबाबत परिसरातील ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देऊन, संबंधित अधिकारी यांची प्रत्यक्ष भेटी घेऊन त्याबाबत कल्पना दिलेली होती. या विभागाकडून अपघात स्थळाची जागतिक बँक अभियंता यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपायोजना करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप पर्यंत कुठलिही कार्यवाही झाली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना राबवून योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी खोसपुरीचे सरपंच सोमनाथ हारेर, वांजोळीचे चेअरमन बद्रीनाथ खंडागळे, सरपंच आप्पासाहेब खंडागळे, चेअरमन विजयाताई काळे, व्हाईस चेअरमन सुभाष खंडागळे आदींसह ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.