पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शहरात वाचनालय व अभ्यासिका उभारावी
त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी) – युवक घडविण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शहरात वाचनालय व अभ्यासिका उभारण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, किरण घुले, केतन ढवण, मंगेश शिंदे, ऋषिकेश जगताप, दिपक वाघ, गौरव हरबा, आशुतोष पाणमळकर, स्वप्नील कांबळे, शिवम कराळे, पंकज शेंडगे आदी उपस्थित होते.
जिल्हा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो. त्यांनी केलेले कार्य आजही सर्व समाजाला दिशादर्शक आहे. त्यांच्या कार्याला स्मरण करुन व त्रिशताब्दी जयंतीनिमित्त शासनामार्फत युवक-युवतींना अभ्यासासाठी वाचनालय व स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका उभारण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शहरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना चांगल्या प्रकारे वाचनालय व अभ्यासिका उपलब्ध होत नाही. शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने वाचनालय व अभ्यासिका सुरु झाल्यास याचा सर्वसामान्य कुटुंबातील युवक-युवतींना लाभ होणार आहे. तर होतकरु विद्यार्थ्यांमधून अनेक अधिकारी वर्ग घडणे शक्य होणार आहे. – इंजि. केतन क्षीरसागर (शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस)