पोलिसांची घरच सुरक्षित नाहीत, तर सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय ? ;
शहरातील वाढत्या चोऱ्यांच्या प्रश्नावरून किरण काळेंचा जिल्हा पोलीस अधीक्षकांना संतप्त सवाल
प्रतिनिधी : मागील काही दिवसांपासून नगर शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पूर्वी रात्री चोऱ्या व्हायच्या. आता तर दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी शहराच्या सावेडी उपनगरातील एका बिल्डिंगमध्ये दिवसाच्या वेळी एकाच वेळी एकाच मजल्यावरील तीन घरांमध्ये चोरी करत चोरट्यांनी पैसे, दागिने यासह ऐवज लंपास केला. एवढेच नाही तर काल पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांच्या केडगाव उपनगरातील सोनेवाडी रस्त्यावर असणाऱ्या घरात देखील दिवसाढवळ्या चोरट्यांनी चोरी करत दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन पाठविले आहे. पोलिसांची घरच सुरक्षित नाहीत, तर सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय ? असा संतप्त सवाल काळे यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.
काळे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, पोलीस उपनिरीक्षक वारूळे यांच्या घरी चोरी करणारे चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. जर पोलीसांची घरच चोरट्यां पासून सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी सुरक्षेची पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षा बाळगावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचे पोलिसांकडे ट्रॅक रेकॉर्ड उपलब्ध आहे. सराईत चोरट्यांवर पोलिसांनी घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने जरब निर्माण केली पाहिजे. तसेच जे गुन्हेगार अद्यापही पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेले नाहीत अशांचा शोध घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जरब निर्माण केली पाहिजे.
काळे यांनी पुढे म्हटले आहे, चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून नागरिकांचा चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करत परत तो नागरिकांना मिळवून दिला पाहिजे. चोरट्यांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला पाहिजे. सर्वसामान्य नागरिक आणि त्यांच्या घरांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे. त्यामुळे पोलिसांनी या बाबतीमध्ये कठोर पाऊले उचलावीत.
गस्त वाढविण्याची मागणी :
शहर पोलीस उपाधीक्षकांसह शहर हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना याबाबतीत आदेश करत प्रतिबंधात्मक उपाययोजनां बाबत पाऊले उचलावीत. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे किरण काळे यांनी केली आहे.
- Advertisement -