पोलीसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी व ग्रीन फिल्डचा दर्जा

शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अमंलदारांच्या ११२ निवासस्थानांचे उद्घाटन

शिर्डी,प्रतिनिधी – पोलीस दलाच्या आधुनिकीकरणा बरोबरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलीसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.
शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अमंलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, श्री.साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार किशोर दराडे, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसळकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस उप महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील ७५ पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलीसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमास ८६० कोटी उपलब्ध करून दिली आहेत. या निधीत जूलै अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये अधिक वाढ करण्यात येईल. असा शब्द मी आज राज्याच्या गृहमंत्र्यांना देतो. पोलीसांसाठी ५३५ स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आली नाही.
पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे. याबरोबरच पोलीस दलाची मान खालावली जाईल असे काम पोलीसा़नी करू नये. असे ही उपमुख्यमंत्री श्री.पवार या़नी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार म्हणाले, गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस दलासोबत इतर विभागांनी ही एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करावे. गुन्हे कमी झाल्यास राज्याचे उत्पन्न वाढते. जिल्हा नियोजन मधून पोलीसांना वाहने उपलब्ध करून देण्यात येतील.

शिर्डी विमानतळ विकासासाठी १५० कोटी –

शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे‌. त्यातून कॉर्गा टर्मिनल, नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील.
यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल. यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, राज्यातील पोलीसांना सुसज्ज घरे मिळाल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होणार आहे. राज्यातील पोलीसांना पुढील दोन महिन्यांत ६८५३ घरे उपलब्ध करून देण्यात येतील. शासनाने एसआरपीएफ मधील पोलीसांना राज्य पोलिसात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस शिपायास निवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला.
कोरोना काळात पोलीसांनी रस्त्यावर येऊन चोवीस तास काम केले. गृह विभाग पोलीसांना घरे व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे‌. राज्यात धार्मिक तेढ व अशांतता निर्माण होणार नाही. यासाठी काम करावे.असेही गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी सांगितले.
या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी केले आहे. यावेळी श्री.अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात २ महिला पोलिस व १ पुरूष पोलीस अंमलदारास फ्लॅटच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संयोजन अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, कार्यकारी अभियंता सुनिल‌ सांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, हिरालाल पाटील यांनी केले.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles