नेवासा फाटा (प्रतिनिधी) – समाजसेवेच्या गोंडस नावाखाली नेवासा पोलीस ठाण्यातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्षुल्लक कारणांवरुन ‘टार्गेट’ करण्याचे प्रकार वाढल्याबद्दल जाणकारांनी नाराजी व्यक्त केली असून यामुळे पोलीस दलाचे नाहक खच्चीकरण होऊन त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरित दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांत नेवासा पोलीस ठाणे सातत्याने वादग्रस्त बनत चालले आहे. खाकीच्या आडून केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांवर सामाजिक दबाव हवा, याबद्दल दुमत नसले तरी दोष नसतानाही काही पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर अर्धवट माहितीच्या आधारे शिंतोडे उडविण्याचे प्रकार वाढत चालले आहेत, ही वेगळीच समस्या बनू पाहत आहे.
कर्तव्य बजावत असताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुखावले गेलेल्या काही व्यक्ती सामाजिक,राजकीय संघटनांच्या आडून क्षुल्लक कारणावरुन निमित्त काढून गंभीर आरोप करत हल्ले चढवत असल्याचे दिसून आले आहे.
वस्तुस्थिती लक्षात न घेता गंभीर स्वरुपांचे आरोप करुन त्यांच्या वरीष्ठांकडे लेखी स्वरुपात तक्रारी करण्याचे प्रस्थ वाढीस लागल्यामुळे प्रसंगी नाईलाजाने कर्तव्याकडे दुर्लक्ष करुन आपण कुठलाही गैरप्रकार केलेला नसल्याबाबत खुलासा करत बसण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली आहे.या वाढत्या प्रकारांमुळे पोलीस दलाचे मनोबल खालावले असून यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरित दुष्परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच याची गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात असून आरोप, तक्रार अर्जांची शहानिशा केल्याशिवाय पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे प्रकार बंद करण्याबाबतचा मतप्रवाह आहे.
आरोप किंवा तक्रार करणाऱ्या व्यक्तीची सामाजिक उंची किंवा तक्रार करण्यामागचा त्याचा उद्देश जाणून घेतल्याशिवाय पोलीसांना कर्तव्याव्यतिरिक्त इतर गोष्टींत गुंतवून ठेऊ नये, अशी अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.