पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला
खा. नीलेश लंके यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
पावसाळयाच्या पार्श्वभूमीचा विचार करण्याची मागणी
नगर : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या वतीने येत्या १९ जुनपासून पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे.
पावसामुळे ही चाचणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी खा. नीलेश लंके यांची भेट घेऊन ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली होती. उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन लंके यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून उमेदवारांच्या अडचणींकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.
खा.लंके यांनी पाठविलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे की, सध्या पावसाळा सुरू असून दिवसभर पावसाचे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. हवामान खात्यानेही पुुढील काही दिवस पावसाचे असल्याचा अंदाज वर्तविलेला आहे. राज्यात पावसाचे वातावरण असल्याने, पाउस झाल्यानंतर पोलीस भरती मैदानी चाचणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
मागील आठवडयापासून पाऊस पडत असल्याने भरती प्रक्रियेसाठी मैदान चाचणीचा उमेदवारांना सराव करता आलेला नाही. आतापर्यंत उमेदवारांनी मोकळया मैदानावर सराव केलेला असल्याने आता पावसामुळे चिखल झालेल्या मैदानावर चाचणी देणे त्यांना कठीण जाणार असल्याचे लंके यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
पावसात तसेच चिखलात मैदानी चाचणी देणे उमेदवारांसाठी धोक्याचे असून त्यातून दुखापत होऊन उमेदवार जायबंदी होण्याचीही भिती आहे. चाचणीच्या दिवशी अचानक पाऊस सुरू होऊन भरती प्रक्रिया प्रभावीत झाल्यास त्याचा परिणाम वर्षानुवर्षे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे.
भरती प्रक्रियेच्या ठिकाणी पाऊस असेल, तिथे पुरेशी व्यवस्था नसेल तर त्या ठिकाणी अस्वच्छता पसरून रोगराईलाही निमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पावसात भिजल्याने जंतुसंसर्ग होऊन भरतीसाठी आलेले तरूण आजारी पडू शकतात. या सर्व गोष्टींचा विचार करून भरती चाचणी प्रक्रिया पुढे ढकलण्याची उमेदवारांची मागणी आहे. या मागणीचा विचार करून ही प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करण्याची विनंती लंके यांनी केली आहे.