प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या पाककला वर्गाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दिपाली बिहाणी यांचे पौष्टिक व सकस आहाराच्या रेसीपींचे मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी मोफत पाककला प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिपाली बिहाणी यांनी उत्तम आरोग्यासाठी आहार महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करीत, पौष्टिक व सकस आहाराच्या रेसीपी सांगितल्या. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्पेशल मॉकटेल, पौष्टिक आंब्याचे पदार्थ, कैरी व मुखवास मॉकटेल, मावा मँगो, मलईपुरी बक, स्नॅक्स, उपवासाचे डोनट आदी विविध पदार्थ प्रात्यक्षिकासह बनवून दाखविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी दादी-नानी ग्रुपचे अध्यक्ष जयाताई गायकवाड, उपाध्यक्ष सविता गांधी, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, उपाध्यक्षा वंदना गारुडकर, सचिव जयश्री पुरोहित, मेघना मुनोत, राखी जाधव, उषा सोनी, मनीषा देवकर, साधना भळगट, रेखा मुथियान आदी उपस्थित होते.
जयाताई गायकवाड म्हणाल्या की, धावपळीच्या जीवनात महिलांना स्वतःसाठी वेळ देवून जीवनाचा आनंद घ्यावा. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना स्वत:मधील कला, गुण व कौशल्यांना वाव देण्याचे काम करावे. एखादा छंद जोपासल्यास ताण-तणाव कमी होत असल्याचे सांगितले.
दिपाली बिहाणी म्हणाल्या की, बदलत्या ऋतूनुसार आहारात देखील बदल आवश्यक आहे. ऋतूनुसार योग्य व सकस आहार घेतल्यास आरोग्यावर दुष्परिणाम न होता, उत्तम आरोग्य टिकून राहत असल्याचे, ते म्हणाल्या. प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी मागील पंचवीस वर्षापासून प्रयास ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी कार्य सुरु आहे. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महिलांसाठी मेघना मुनोत यांनी विविध बौध्दिक व मनोरंजनात्मक स्पर्धा घेतल्या.
विजेत्या महिलांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यामध्ये हेमा कटारिया, वैशाली आपटे, मीनाक्षी कुलकर्णी, सुजाता गोरे, वर्षा वाबळे, प्रेमलता चोपडा यांनी बक्षिस पटकाविले. जयश्री पुरोहित यांना नारीशक्ती पुरस्कार मिळाल्याबद्दल अलकाताई मुंदडा यांच्या हस्ते त्यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलोनी मुंदडा यांनी केले. आभार राखी जाधव यांनी मानले.