बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने रावसाहेब काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करुन शहरातून रॅली
खासदार हा सर्वसामान्यांतून आलेला व सर्वसामान्यांची प्रश्न मांडणारा असावा -काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन मुक्ती पार्टीचे नगर दक्षिणचे उमेदवार रावसाहेब काळे यांनी गुरुवारी (दि.25 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातून पारंपारिक वाद्यांसह मिरवणुक काढून महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. या रॅलात बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रॅलीचे प्रारंभ झाले. माळीवाडा येथील महात्मा फुले व मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शहरातून रॅली काढण्यात आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काळे यांचा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, ख्रिश्चन मोर्चाचे अजय देठे, बेरोजगार मोर्चाचे राहुल पगारे, मुस्लिम मोर्चाचे खालीद खान, बहुजन क्रांती मोर्चाचे युसुफ शेख, धडक जनरल कामगार संघटना श्रीधर शेलार, छत्रपती क्रांती सेनेचे उत्तम पवार, बी.एम.पी. चे ॲड. प्रकाश आदी उपस्थित होते.
रावसाहेब काळे म्हणाले की, लोकसभेत जिल्ह्याचे नेतृत्व करणारा खासदार हा सर्वसामान्यांतून आलेला व सर्वसामान्यांची प्रश्न मांडणारा असला पाहिजे. दक्षिणेत प्रभावी नेतृत्व मिळाले नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबीत आहे. सर्वसामान्य कामगार, बेरोजगार युवक व शेतकऱ्यांसाठी माझी उमेदवारी आहे. नागरिकांसमोर शहराच्या नामांतरासारखे खोटे प्रश्न उभे करून दिशाभूल केली जात आहे. बेरोजगारी, महागाई, आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नावर बोलण्यासाठी उत्तर नसल्याने नागरिकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
काळे यांच्या उमेदवारीस भारत मुक्ती मोर्चा इंडियन प्रोफेशनल असोसिएशन, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, छत्रपती क्रांती मोर्चा या सर्व संघटनेने पाठिंबा जाहीर केला.
- Advertisement -