संघटनेचे कामगार मंत्री ना.हसन मुश्रिफ यांना निवेदन
अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हा इमारत व बांधकाम कामागार संघटनेच्यावतीने पालकमंत्री ना.हसन मुश्रिफ यांना नोंदीत बांधकाम कामगारांना पूर्वीप्रमाणे आरोग्य विमा सुरु करण्यात यावा, याबाबतचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी आ.संग्राम जगताप, संघटनेचे अध्यक्ष कॉ.बाबा आरगडे, कार्याध्यक्ष अविनाश घुले, सरचिटणीस नंदू डहाणे, अजित साळवे आदि उपस्थित होते.
कामगार मंत्री तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रिफ यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,बांधकाम क्षेत्रात काम करतांना कामगार जोखमीचे काम करत असतात,अशा परिस्थितीत काही दुर्घटना झाल्यास त्यांचा आरोग्य विमा असल्याचे तातडीने उपचार होऊ शकतात,त्याच बरोबर आर्थिक भारही त्यांच्यावर येणार नाही.यापुर्वी आपण कामगार मंत्री असतांना ही आरोग्य विमा योजना सुरु होती,परंतु मागील सरकारने ही योजना बंद केल्याने हजारो कामगार आरोग्य विम्यापासून वंचित राहिले व आजही आहेत.तेव्हा आपण आपण पुन्हा कामगार मंत्री आहोत त्यावेळी सुरु असलेली योजना पुन्हा कार्यान्वित करुन बांधकाम कामगारांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवावा, असे निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी ना.हसन मुश्रिफ यांनी याबाबत आपण मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन संबंधितांशी चर्चा करुन निर्णय घेऊ.कामगारांच्या आरोग्य विम्याबाबत सकारात्मक निर्णय होईल,असे आश्वासन दिले.यावेळी आ.संग्राम जगताप यांनीही आपण यासाठी पाठपुरावा करु, असे सांगितले.
यावेळी अविनाश घुले म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने नेहमीच हमाल, माथाडी, बांधकाम कामगार अशा रोजंदारीवर काम करणार्यांचे संघटन करुन त्यांच्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत. आताही इमारत बांधकाम कामगारांसाठी असलेली व आता सध्या बंद झालेली आरोग्य विमा योजना लागू व्हावी, यासाठी आपण अग्रही असून, आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री तथा कामगार मंत्री ना.हसन मुश्रिफ यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच या योजनेबाबत चांगला निर्णय होईल. व कामगारांसाठी ही योजना अंमलात येईल, असा विश्वास व्यक्त केला.