बारावी पास विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणा विषयी गुरुवारी न्यू आर्ट्स मध्ये मार्गदर्शन
नवीन शैक्षणिक धोरणातील संधीविषयी केले जाणार मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी) – बारावी पास विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणातील संधीविषयी न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात गुरुवारी (दि.27 जून) मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरण 2020, स्कूल कनेक्ट (एनईपी कनेक्ट) या अभियानांतर्गत नवीन शैक्षणिक धोरणाच्या जाणीव व जागृतीच्या उद्देशाने ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत बारावीत शिकत असलेले व उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, डॉ. दिलीप ठुबे, प्रा. कल्पना दारकुंडे, पर्यवेक्षक गोरे सर यांनी केले आहे.
गुरुवारी सकाळी 10.30 वाजता या कार्यशाळेला प्रारंभ होणार आहे. या कार्यशाळेत बारावी मधील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शैक्षणिक व्यवस्थेत झालेल्या बदलांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना नोकरी व व्यवसायाच्या नवीन संधी कशा मिळवता येऊ शकतात? याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये दिशाहीन न होता, योग्य त्या दिशेने जावे व आपले ध्येय साध्य करावे यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे.
या कार्यशाळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तयार केलेल्या मार्गदर्शक व्हिडिओचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच डॉ. मंगेश वाघमारे यांचे विशेष व्यख्यान होणार आहे. 12 वी पास झालेल्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे म्हंटले आहे. या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. नागेश शेळके यांच्याशी सपंर्क साधून नाव नोंदणी करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.