लोकशाहीवादी भाजपात अनुसूचित जातीच्या बहुसंख्य महिलांनी येऊन सत्ताधारी व साधन संपन्न व्हावे – अॅड. वाल्मिक निकाळजे
अहमदनगर प्रतिनिधी – अनुसूचित जाती आणि शोषित समाजाला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्ताधारी जमात होण्याचे व सक्षम होण्याचे सांगितलेले आहे. त्यामुळे सत्ताधारी होण्यासाठी व समाजाची संपूर्ण प्रगती आणि उन्नती साधण्यासाठी अनुसूचित जातीच्या बहुसंख्य महिलांनी एकमेव लोकशाहीवादी असलेल्या भाजप या राजकीय पक्षात यावे, असे आवाहन भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी अॅड. वाल्मिक (तात्या) निकाळजे यांनी केले.
गांधी मैदान येथील भाजपाच्या पक्ष कार्यालयात भाजपा अनुसुचित जाती महिला मोर्चाच्या अहमदनगर शहर जिल्हा पदाधिकार्यांच्या नियुक्ती कार्यक्रम प्रसंगी अॅड. निकाळजे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे हे होते.
यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, भाजपा अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा कुसुमताई शेलार व भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
अॅड.निकाळजे पुढे म्हणाले की,भारतात जनकल्याणकारी सरकारची मुहुर्तमेढ प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या रुपाने रोवली गेली आहे. शेवटच्या घटकांच्या कल्याणासाठी आणि अंत्योदयासाठी प्रधानमंत्री मोदीजी आणि सर्व भाजपा नेते योगदान देत आहेत. त्याचा लाभ घेऊन भाजपा मध्ये सत्ताधारी होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करावे असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले.
अध्यक्षीय भाषणात भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे म्हणाले की, सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम भारतीय जनता पार्टी करीत आहे.तळागाळातील शोषित पीडित महिलांना आणि संपूर्ण मागासवर्गीयांना शक्तिमान करण्याचे व समाजाचा सर्वांगीण उन्नती साधण्याचे कार्य प्रधानमंत्री मोदीजी करीत आहेत. शोषित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभ सर्वांनीच घेऊन आपली व सर्वसामान्य जनतेची प्रगती अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी साधावी असे त्यांनी सांगितले.
नवनियुक्त सर्व महिला पदाधिकार्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.अनुसुचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा कुसुमताई शेलार यांनी प्रास्ताविकात शहर भाजपा अनुसूचित जाती महिला मोर्चा मोदी सरकारच्या व भाजपच्या सर्व विकासाच्या योजना व ध्येय-धोरणे अनुसूचित जातीच्या घरा-घरापर्यंत पोहचविण्याचे कार्य करणार आहे.भाजपमध्ये सर्व समाजातील महिलांना सन्मान व पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी देण्यात आली आहे.समाजात सक्रीय असलेल्या व सामाजिक योगदान देणार्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर कटोरे, ऋग्वेद गंधे, भाजपा अनु.जाती मोर्चाचे शहर जिल्हा संघटन सरचिटणीस अॅड. किरण भिंगारदिवे, शहर जिल्हा सरचिटणीस अॅड.अभिजित अडागळे, संतोष पाटोळे, मंडल अध्यक्ष अशोक भोसले, अजय देवकुळे, शहर सचिव सुनिल सकट, साहेबराव काते, सोनू साबळे, शहर उपाध्यक्ष दिपक उमाप, लक्ष्मीकांत तिवारी आदींसह महिला पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. अभिजित अडागळे यांनी केले.आभार सरचिटणीस संतोष पाटोळे यांनी मानले.