हुतात्मा स्मारकात कारगिल विजय दिवस साजरा
मेणबत्त्या प्रज्वलीत करुन व पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभक्तीच्या गीतांनी प्रफुल्लीत झालेल्या वातवरणात शहरातील हुतात्मा स्मारकात बुधवारी (दि.26 जुलै) कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. भारत माता की जय…, वंदे मातरम…, शहीद जवान अमर रहे!… च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला. लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लिओ क्लब ऑफ अहमदनगर, मराठी पत्रकार परिषद, रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळा व गुरु अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आर्मड कॉर्प्स सेंटर ॲण्ड स्कूलच्या शिक्षणाधिकारी मेजर विदूशी पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, सुभेदार रमेश बेल्हेकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष धनंजय भंडारे, सचिव दिलीप कुलकर्णी, खजिनदार नितीन मुनोत, लिओच्या अध्यक्षा आंचल कंत्रोड, जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, आनंद बोरा, डॉ. अमित बडवे, हरमनकौर वधवा, पुरुषोत्तम झंवर, डॉ. संजय असनानी, डॉ. मानसी असनानी, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव भद्रे, ज्येष्ठ शिक्षक प्रभाकर थोरात, ज्योती मोकळ, जालिंदर सिनारे, प्रशांत मुनोत, डॉ. प्रिया मुनोत, प्रीत कंत्रोड आदींसह रयतच्या जिजामाता कन्या निवासच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात लायन्सचे अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी नागरिक व युवकांनी मनात देशभक्ती प्रज्वलित ठेऊन जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ते अविरतपणे करत असलेल्या देश रक्षणाच्या कार्याने देशातील जनता सुखी जीवन जगत असून, देशासाठी शहिद झालेल्या जवानांबद्दल अभिमान बाळगणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. सुभेदार रमेश बेल्हेकर यांनी कारगिलच्या लढाईत एअर फोर्समध्ये कार्यरत असताना त्यावेळच्या अठवणींना उजाळा दिला.
मेजर विदूशी पांडे म्हणाल्या की, कारगिलच्या विजयासाठी अनेक सैनिकांनी जीवाची बाजी लावून, प्राणाची आहुती दिली. देशाचे रक्षण करून आपली अस्मिता जिवंत ठेवली. या देशरक्षणाच्या कार्यात ज्यांनी बलिदान दिले, त्यांना स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. भावी पिढीने देखील देशाच्या हितासाठी कार्य करावे. देश निष्ठा ठेवून प्रत्येक कार्यात देशाच्या विकासात्मक वाटचालीत योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.
रयत शिक्षण संस्थेच्या जिजामाता कन्या निवास (वस्तीगृह) मधील विद्यार्थिनींनी देशभक्तीवर गीते सादर केली. शाळेतील विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून जवानांप्रती आदरांजली वाहिली. लायन्सच्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत बेल्जियम येथून भारतात सांस्कृतिक माहिती घेण्यासाठी आलेल्या डेजॉकहिर मारथे यांनी देखील या कार्यक्रमात हजेरी लावून कारगिल मधील शहिदांना श्रध्दांजली वाहिली. उपस्थितांसह विद्यार्थ्यांनी मेणबत्त्या प्रज्वलीत करुन वीर जवानांना नमन केले. तर पाहुण्यांच्या हस्ते पुष्पचक्र हुतात्मा स्मारकावर अर्पण करुन कारगिल मधील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा यांनी केले. मन्सूर शेख यांनी आभार मानले.