भाळवणी औद्योगिक क्षेत्रातील त्या दोन कंपन्यांवर कारवाई व्हावी
अवैध बांधकाम व पर्यावरण कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघन केल्याचा आरोप
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील भाळवणी औद्योगिक क्षेत्रातील त्या दोन कंपन्यांवर अवैध बांधकाम व पर्यावरण कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघन प्रकरणी कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालयास दिले असून, सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाचा इशारा दिला आहे.
पारनेर तालुक्यातील मौजे भाळवणी औद्योगिक क्षेत्रात ॲल्युमिनियम व पॉली प्रॉडक्ट्सच्या कारखान्यातील अवैध बांधकाम व पर्यावरण कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन प्रकरणी तक्रार करुन देखील त्या कंपनीवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. सदर कंपनीने अवैध बांधकाम करून नियमांचे उल्लंघन केले असून, याप्रकरणी चौकशी होवून अवैध बांधकाम पाडण्यात यावे.
या कारखान्यांमध्ये कामगारांच्या आरोग्य व सुरक्षेला धोका निर्माण होईल असे बांधकाम स्ट्रक्चर उभारले असून, चेकलिस्ट प्रमाणे व्हिजिट इन्स्पेक्शन करून अवैध बांधकाम तात्काळ पाडण्यात यावे. या कारखान्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या संमती पत्रातील अटी व शर्तीचे व्यापक स्वरूपाचे उल्लंघन होत असून, व्हिजिट इन्सपेक्शन करून त्या कारखान्यावर पर्यावरण संरक्षण कायदा 1986 मधील तरतुदीन्वये कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
यापैकी एका कंपनीत यापूर्वी वायू गळती झाली होती. दोन दिवसांपूर्वी पुन्हा वायू गळती झाली असून, या कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कामगारांना जीव मुठीत धरून काम करावे लागते. भविष्यात काही जीवित हानी झाल्यास त्या कंपनीवर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, औद्योगिक क्षेत्रात गॅस गळती झाल्यास कोणत्याही कंपनीत अग्निशामक किंवा गॅस प्रतिबंधक योजना उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अवैध बांधकाम व पर्यावरण कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघन प्रकरणी सदरील दोन्ही कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.