भ्रष्टाचारी, अनागोंदी आणि टोलवाटोलवी करणाऱ्या लोकप्रतिनिधी विरुद्ध सविनय डिच्चूकावा
लोकभज्ञाक जागृती मोहीमेचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाच्या संसदीय लोकशाहीमध्ये विश्वासहार्य लोकप्रतिनिधींना प्राधान्य देऊन भ्रष्टाचारी, अनागोंदी आणि टोलवाटोलवी करणाऱ्या लोकप्रतिनिधी विरुद्ध सविनय डिच्चूकावा या लोकास्त्राचा जाणीवपूर्वक वापर करावा, यासाठी लोकभज्ञाक जागृती मोहीम सुरू केली असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा डिच्चूकावा की ज्यामध्ये भ्रष्टाचारी आणि टोलवाटोलवी करणाऱ्या व्यक्तीला समाजातून कायमचे दूर करण्याचे तंत्र वापरले जात होते. त्याचबरोबर महात्मा गांधीजींचा सत्य आणि अहिंसेवर आधारित सविनय मार्ग यांचे संकरातून लोकभज्ञाक चळवळीने डिच्चूकावा जारी केला आहे. समाजाच्या प्रत्येक व्यवहारात विश्वासाला महत्त्व दिले जाते. परंतु अनेक लोक आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन भ्रष्टाचार करतात. संसदीय लोकशाहीत निवडून गेलेल्या नगरसेवकांपासून खासदारांपर्यंतचे लोक सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी लोकांचा विश्वासघात करतात याला आळा बसविण्यासाठी सविनय डिच्चूकावा तंत्राशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना महामारीच्या काळात अनेक संधीसाधू डॉक्टरांनी लाखो रुपयांची बिलं करून कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रेत फक्त परत दिली. त्यातून कोट्यावधी रुपये अशा डॉक्टरांनी मिळविले. अनेक डॉक्टरांविरुद्ध रुग्णांचे नातेवाईकांनी थकविलेले पैसे परत घेण्यासाठी आजही तगादा लावला आहे. त्यामुळे अशा डॉक्टरांविरुद्धसुद्धा सविनय डिच्चूकावा लोकांनी वापरावा अशा डॉक्टरांपासून आणि दवाखान्यांपासून लोकांनी दूर रहावे असा आग्रह संघटनेने धरला आहे. अनेक पेट्रोल पंपावर बाजार भावने पैसे घेऊनही पेट्रोल चोरले जाते याला, मापात पाप असे म्हणतात. अशा पेट्रोल पंपावर तमाम जनतेने सविनय डिच्चूकावा वापरण्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.
समाजातील अनेक ढोंगी, लबाड, भ्रष्टाचार करणाऱ्या घटकांविरुद्ध सविनय डिच्चूकावा यासारखे नामी तंत्र नाही, असे संघटनेने जाहीर केले. समाज विश्वासाला महत्त्व देतो आणि विश्वासघात करणाऱ्याला त्याचे परिणाम भोगायला लावणे याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही न्यायालयातून अशा ढोंगी आणि भ्रष्टाचारी लोकांना सजा करणे अवघड आहे. त्यामुळे लोकचळवळीतूनच याला यश येणे आवश्यक असल्याचे ॲड. गवळी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. या चळवळीसाठी ओम कदम, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.