अहमदनगर प्रतिनिधी – जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटने संदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देत दुर्घटना झालेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली.त्यानंतर त्यांनी सध्या कार्यरत असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांच्याशी घडलेल्या घटने संदर्भात चर्चा केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की एकूणच उपलब्ध मिळालेली माहिती सिव्हिल सर्जन यांच्याशी झालेली चर्चा या अनुषंगाने असे दिसून येत आहे की या ठिकाणी फायर ऑडिट बाबत माहिती असतानाही या ठिकाणी असणाऱ्या तांत्रिक दुरुस्त्या या केल्या गेल्या नाहीत.
त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाची असलेली तांत्रिक आणि बांधकामाची जबाबदारी संबंधित इंजिनिअर यांनी पार पाडल्याचे दिसून येत नसल्याचे दिसून येत आहे.त्या अनुषंगाने आता जर या दुर्घटनेची चौकशी होत असताना जिल्हा रुग्णालयाचे विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक हेच त्या पदावर कार्यरत असतील तर ही चौकशी निर्धोक होऊ शकणार नाही.त्यामुळे त्यांना सर्वप्रथम त्या पदावरून हटवण्यात आलं पाहिजे.त्याच बरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे ही संबंधित अधिकारी असतील त्यांनाही तात्काळ निलंबित केले पाहिजे.
अन्यथा या प्रकारच्या घटना यापुढेही होतील आणि त्या घटनेला नेमके जबाबदार कोण हे पुढे येणार नाही. त्यामुळे समितीने चौकशी करण्यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित इंजिनियर यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांना या चौकशी पासून दूर ठेवले पाहिजे अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना केली.