कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
बँक ऑफ महाराष्ट्र यांची कर्जत येथे शाखा आहे,मात्र त्यांना एटीएम मशीन नाही. यामुळे त्याचा फटका सर्व नागरिक व ग्राहकांना बसत असून, सीनियर सिटीजन यांचे मात्र चांगलेच हाल होत असून, कर्जत येथील शाखेला कोणी एटीएम मशीन देईल का …. अशी म्हणण्याची वेळ बँकेच्या ग्राहकांवर व नागरिकांवर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना धाब्यावर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक व्यक्तीचा व्यवहार पारदर्शक व्हावा आणि जास्तीत जास्त बँकिंग ऑनलाइन व्यवहार केले जावेत या हेतूनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल केले आहेत.
मात्र अजूनही राज्याचे नाव वापरणारी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यासारख्या बँका पुरातन काळातील पद्धतीने कारभार पाहत आहेत, अत्याधुनिक पद्धतीने कार्य करण्यास येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मानसिकता दिसून येत नाही त्याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे, सध्या सर्वात जास्त वापर एटीएम कार्डचा होतो.यासाठी नागरी एटीएम घेण्यासाठी बँकेत आले तर त्यांना कार्ड मिळते परंतु ते सुरू करण्यासाठी नागरिकांना चक्क २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्जत तालुक्यातील मिरजगाव सारख्या छोट्या गावांमध्ये जावे लागत आहे.
यामुळे अनावश्यक मानसिक व शारीरिक त्रास महाराष्ट्र बँकेच्या ग्राहकांना सहन करावा लागत आहे ही बँक सेवा हे आपले कर्तव्य आहे हे विसरले की दिसून येते, वास्तविक पाहता कर्जत हे तालुक्याचे ठिकाण या ठिकाणी होणारी उलाढाल व्यापारी बाजारपेठ या सर्व पार्श्वभूमीवर कर्जत येथील शाखा अत्याधुनिक करण्याची आवश्यकता असताना बँकेच्या अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे त्याचा त्रास सर्वांनाच होत असल्याचे दिसून येते.
एटीएम मशीन गायब
गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेचे एटीएम मशीन गायब झाली आहे , याबाबत शाखाधिकारी सुनील भोंडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, येथे असणारे मशीन आम्हाला जागा मिळत नसल्यामुळे काढून घेण्यात आले आहे, आता जागा मिळाल्यावर व वरून परवानगी मिळाल्यानंतर ते बसवण्यात येणार आहे मशीन कधी येईल हे काही सांगता येणार नाही व आमच्या हातामध्ये सध्या काहीच नाही सर्व वरिष्ठ अधिकारी ठरवतात असे सांगितले.
कोरोनाचा फैलाव महाराष्ट्र बँक करीत आहे
वास्तविक पाहता सर्व बँकांचे धोरण एटीएम मशीन मध्येच नागरिकांनी पैसे काढण्यासाठी किंवा प्रसंगी आता भरण्यासाठी जावे अशी व्यवस्था केलेली आहे , यामुळे आपोआप बँकांची मधील गर्दी कमी होत आहे.
मात्र महाराष्ट्र बँकेने एटीएम मशीन बंद ठेवून प्रत्येकाला बँकेमध्ये येण्यास भाग पाडले आहे.येथे असलेली शाखा अतिशय लहान जागेमध्ये आहे आणि यामुळे येथे सातत्याने मोठी गर्दी झाल्याचे दिसून येते.यामुळे सोशल डिस्टेंस किंवा कोणतीही व्यवस्था याठिकाणी करण्यात आलेले नाही.बँकेच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा फैलाव कर्जत शहर व तालुक्यामध्ये होऊन अनेक सीनियर सिटीजन यांचा जीव महाराष्ट्र बँक धोक्यात घालत असल्याचे दिसून येते.याबाबत बँक प्रशासनावर कारवाई करण्याची गरज असल्याचे दिसून येते.
आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घ्यावा
कर्जत शहरामध्ये अजूनही राष्ट्रीयकृत बँका अद्यावत होत नसून त्याचा त्रास नागरिक व्यापारी विद्यार्थी सीनियर सिटीजन या सर्वांनाच होत आहे,राष्ट्रीयीकृत बँका या सेवा पुरविण्यासाठी असताना देखील ग्राहकांचे हाल करीत आहेत महाराष्ट्र बँकेकडे एटीएम मशीन नाही.
यामुळे आता आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन ते या मतदारसंघाचे नेतृत्व करत असल्यामुळे त्यांनी या बँकेला जागेसह मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे किंवा देशपातळीवरील काही चांगल्या राष्ट्रीयकृत बँका कर्जत शहरामध्ये सुरू करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घ्यावा अशी देखील मागणी नागरिक करीत आहेत.